26.5 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriमद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

अभद्र बडबड तसेच शिवराळ भाषा वापरत तिने प्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवतीने रात्रभर तमाशा करत प्रवाशांना हैराण केले. याबाबत प्रवाशांनी चेन ओढून पोलिसांना याची खबर दिली. मात्र पूर्ण नशेत असलेल्या तरुणीपुढे पोलिस तसेच टीसी आणि प्रवाशांचे काहीच चालले नाही. शेवटी ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतर ठाणे येथे पोलिसांचे पथक महिला पोलिसासह दाखल झाल्याने रात्रभर धिंगाणा घालणाऱ्या या तरुणीवर कारवाई करण्यात आली. रत्नागिरीपासून ठाण्यापर्यंत प्रवाशांना हैराण करणाऱ्या या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मडगाववरुन गुरुवार दि. १० रोजी कोकण कन्या एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे सुटली. या ट्रेनमध्ये एचए१ या एसी डब्यांत गोव्याहून एक तरुणी आपल्या बहिणीसह प्रवास करत होती. रत्नागिरी येथे कोकण कन्या एक्स्प्रेस आली असता या तरुणीने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. अभद्र बडबड तसेच शिवराळ भाषा वापरत तिने प्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रवाशांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तिचे बडबडणे आणि गोंधळ घालणे थांबले नाही.

डब्यामध्ये असलेल्या सर्वच प्रवाशांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र ही तरुणी या प्रवाशांवर तुटून पडत होती. या डब्यात बुजूर्गापासून लहान मुलांचा समावेश होता. ही तरुणी प्रचंड मद्यपान केल्याने तिचे नियंत्रण सुटले होते कदाचित तिने ड्रग्ज घेतले होती की काय अशी स्थिती तिच्या अवतारावरुन प्रवाशांना दिसून येत होती. रत्नागिरीपासून सुरु झालेला हा तमाशा काही थांबत नव्हता म्हणून प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे पोलिसांनीही धाव घेतली. चिपळूण येथे दोन आरपीएफचे पोलिस आले मात्र या पोलिसांना त्या युवतीला आवरणे मुश्कील झाले. गाडी सुरु झाली असता या पोलिसांनीच तेथून चालत्या गाडीतून कोणतीही कारवाई न करता पळ काढला असे प्रवाशांनी सांगितले. पोलिसांचीच अशी अवस्था झाल्यानंतर प्रवासीही हतबल झाले. या दरम्यान ऑनलाईन तक्रारही नोंदवण्यात आली. रोहा दरम्यान पुन्हा चेन ओढण्यात आली.

यावेळी आलेल्या पोलिसांनी कहर करत चेन ओढणाऱ्या प्रवाशांनाच दमदाटी करुन तुम्हाला याठिकाणी उतरावे लागेल असे सांगितले. मात्र प्रवासीही आक्रमक होत जी तरुणी रात्रभर त्रास देत आहे तिच्यावर कारवाई न करता प्रवाशांनाच अडकविले का जात आहे असा पवित्रा घेत या पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान या तरुणीने एका प्रवाशाला लाथ मारली. यावेळी या प्रवाशानेही तिला चांगलेच कानफटवले. काहीजणांनी या प्रकाराचा व्हिडीओ शुटींग व फोटो काढले. त्या तरुणीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या प्रवाशांशीही तिने जोरदार झटापट केली. तिच्यासोबत असलेल्या बहिणीलाही तिने सोडले नाही. तिलाही तिने मारले त्यामुळे ती बहिण वॉशरुममध्ये लपून राहिली. अशाप्रकारे या तरुणीच्या गंभीर प्रकाराने प्रवाशांना रात्रभर लाईट लावून जागरण करावी लागली. ठाणा येताच महिला पोलिस असलेले एक पथक चढल्यानंतर या युवतीला या पथकाने ताब्यात घेऊन ठाण्यात उतरवले.

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी असते. त्यामुळे अशा अनेक प्रकारांना प्रवाशांना वेळोवेळी सामोरे जावे लागते. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा सुरक्षेसाठी मोठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेस्टर्न रेल्वेप्रमाणे डब्यामध्ये पेट्रोलिंग करणारे दोन महिला आणि दोन पुरुष पोलिसांचे पथक कायम सेवेसाठी असते. मात्र कोकण रेल्वे मार्गावर असे कोणतेही पेट्रोलिंग करणारे पथक नसल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular