स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने चालू वीजमीटर काढून तिथे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. बदललेले मीटर जलद रीडिंग दाखवत असल्यामुळे ग्राहक तक्रार घेऊन महावितरण कार्यालयात गेल्यानंतर मीटर तपासण्याची कोणतीच सुविधा महावितरण कंपनी किंवा ठेकेदाराकडे नाहीत. त्यामुळे सदोष मीटर तपासण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली. ऊर्जा विभागावरील चर्चेवेळी, आमदार निकम यांनी विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. विद्युतखांबावरील तारा तुटून पडल्याने विजेचा झटका बसून माणसे तसेच जनावरांचा नाहक बळी जातो. वीजपुरवठा खंडित होतो. या घटनांनंतर शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अनेकवेळा उशिरा मिळते किंवा काहीवेळा मिळतही नाही. म्हणूनच चिपळूण शहरातील सर्व विद्युतवाहिन्या तत्काळ भूमिगत करण्यात याव्यात.
वाडीवस्ती, शाळा, बाजारपेठ आणि रस्ता क्रॉसिंग येथील वीजवाहिन्यांना स्पेसर लावण्यात यावेत. तालुक्यातील मिरजोळी कोलेखाजण येथे महावितरणच्या निष्काळजीपणामळे विद्युतप्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या ५ दुधाळ म्हशी मृत्युमुखी पडल्या व त्यात १ म्हैस गंभीर जखमी झाली. त्यात संबंधित शेतकऱ्याचे ५.२५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने केवळ १.८० लाख इतकीच भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे शासनाने अशा दुर्घटनेबाबत स्पष्ट धोरण व निकष ठरवावेत. महावितरण कंपनीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात विशेषकरून दुधाळ जनावर योजनेप्रमाणे रुपये ८० हजार प्रतिजनावर नुकसान दर लागू करावा, अशी आग्रही मागणी आहे.