27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी...
HomeRatnagiriवाटद एमआयडीसीविरोधात संघर्ष समितीचा एल्गार

वाटद एमआयडीसीविरोधात संघर्ष समितीचा एल्गार

विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे.

कोकणातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती’ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता, खंडाळा येथील सर्वसाक्षी श्रद्धा प्रतिष्ठानमध्ये एका ‘जनआक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सुप्रसिद्ध वकील आणि मानवाधिकार अभियानाचे संयोजक अॅड. असीम सरोदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कोकण जो आपल्या आंब्या-काजूच्या बागांसाठी आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो, तेथील उपजीविकेचे साधन याच बागायतीवर अवलंबून आहे. मात्र, प्रस्तावित एमआयडीसी आणि अदानी-अरामको सारख्या प्रकल्पांसाठी येथील हजारो एकर जमीन कवडीमोल दराने संपादित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. प्रशासनाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, स्थानिकांच्या जमिनींचे संरक्षण आणि हक्कासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा दावा सभेच्या आयोजकांनी केला आहे.

या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली जाणार आहे. या कायदेशीर लढ्यात मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. असीम सरोदे हे विशेष उपस्थित राहणार असून, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष अॅड. रोशन पाटील हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. सभेचे आयोजन ‘वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती’ने केले असून, त्यांना ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था’ आणि ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’ यांचे सहकार्य लाभले आहे.

या सभेत संघर्ष समिती अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, प्रथमेश गावणकर, उमेश रहाटे, चंद्रकांत धोपट, सुरेश घवाळी, दिनेश धनावडे, ओंकार शितप, अशोक निंबरे, प्रदीप वीर, ओंकार चौगुले, तुकाराम कुलये, आणि सुभाष कुर्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ‘एकच जिद्द… वाटड एमआयडीसी रद्द !’ या घोषणेखाली सर्व निसर्गप्रेमी, शेतकरी आणि कोकणवासीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणच्या रक्षणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular