संगमेश्वर येथील सोनवी पूलाला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे या पूलावरुन सध्या फक्त एकेरी वाहतूक सुरु होती. गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ भरा अशा सूचना देवूनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे यावर्षी देखील चाकरमान्यांचे आणि गणपतीचे सुद्धा खड्ड्यातूनच आगमन झाले. खड्ड्यांमुळे पूलाची झालेली दुरवस्था पाहून आज अखेर संगमेश्वर येथील रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील युवकांनी एकत्र येत सोनवी पूलावरील सारे खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासून, युवकांनी हिंदू मुस्लिम एकतेचेही दर्शन घडवले.
मंगळवारी असणारे गौरीगणपती विसर्जन आणि त्यानंतर परत महामार्गावरील होत असणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन संगमेश्वर रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील १५ ते २० युवकांनी जांभा दगड, खडी, जेसीबी इत्यादी आवश्यक सामग्री आणून सुमारे दोन तास श्रमदान करून सोनवी पूलावरील सर्व खड्डे बुजवले. यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि हिंदू मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडून आले. आमदार शेखर निकम यांनी रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील हिंदू मुस्लिम युवकांच्या या समाजविकासशील कृत्याबद्दल अभिनंदन केले आहे.
सोनवी पूल हा ब्रिटिशकालीन पूल आहे. १९३७ साली उभारलेला हा पूल आत्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागातर्फे मात्र या पुलाला अनेक ठिकाणी तडे जावून तसेच वाहने जाताना जोरजोराने हालणारा हा पूल धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी या पूलावर जास्त प्रमाणात खड्डे पडले होते.
पूलावरील जागोजागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पूल अधिकाधिक धोकादायक बनत असतांना ठेकेदार कंपनी अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी हे खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करीत होते. याचा वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन अखेर या पूलावरील खड्डे बुजवले.