तालुक्यात सोमवारी रात्रीपासून आभाळ फाटल्यासारख्या कोसळणाऱ्या पावसाने जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडल्याने येथील जगबुडी नदीला पूर आला. महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक दरडीचा काही भाग मध्यरात्रीच्या सुमारास खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात जाणारे रस्ते जलमय झाल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली असून सध्या ती ६.६० मीटरवरून वाहत आहे.
शहरात पाणी शिरण्याच्या शक्यतेने नगरपालिकेने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, खेड शहरातील अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान, शहरातील मटण- मच्छीमार्केट परिसरात दुचाकीवरून जात असलेली एक महिला अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊ लागली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्फराज पांगारकर, एजाज खेडेकर आणि खलील जुईकर या तरुणांनी प्रसंगावधान राखत धाडसीपणे महिलेला वाचवले. काही क्षणांचाही विलंब झाला असता मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
प्रशासन सतर्क – खेड तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली. ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे. त्यातच कशेडी बोगद्यानजीक दरडीचा काही भाग कोसळला आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन ही सतर्क झाले आहे. आपत्तीकालीन मदतीसाठी वेगवेगळ्या तुकड्या व त्यासाठी लागणारी साधनसामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना वेळीच मदत मिळवी यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.