HomeChiplunकशेडीत लोखंडी जाळ्यांचे 'सुरक्षा कवच'

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

पावसाळ्यामध्ये डोंगरउतारावरून पाणी वेगाने पायथ्याकडे वाहत येते.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी घाटातील दरडी कोसळण्याच्या समस्येवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केली आहे. घाटातील डोंगर कापलेल्या धोकादायक भागांवर मजबूत लोखंडी जाळी बसवण्यात येत आहे. या ‘सुरक्षा कवचा’मुळे पावसाळ्यात कोसळणारे दगड आणि माती थेट महामार्गावर येण्यापासून रोखली जाणार असून, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कशेडी घाट दरड कोसळण्यासाठी २००५ पासून प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे आणि अपघात घडण्याचे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. चौपदरीकरणाच्या महामार्गाच्या कामात डोंगर कापण्यात आल्याने दरडींचा धोका काही प्रमाणात कमी झाला असला तरीही कापलेल्या डोंगराच्या उतारांवरून माती आणि दगड खाली घसरण्याचा नवीन धोका निर्माण झाला होता.

पावसाळ्यामध्ये डोंगरउतारावरून पाणी वेगाने पायथ्याकडे वाहत येते. या पाण्याबरोबर माती, दगड रस्त्यावर पडतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घाटातील चोळई आणि धामणदेवी-भोगाव या सर्वाधिक दरडप्रवण क्षेत्रांमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. या तंत्रज्ञानानुसार, कापलेल्या डोंगराच्या उतारावर मजबूत पोलादी जाळी घट्ट बसवली जाते. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल होणारी माती आणि लहान-मोठे दगड या जाळीतच अडकून राहतात आणि थेट रस्त्यावर येत नाहीत. यामुळे महामार्ग सुरक्षित राहण्यास मदत होते. हे तंत्र कोकण रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी वापरण्यात आले असून, ते यशस्वी झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular