सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वेस्थानक आहे. या स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सव कालावधीत मडुरे ते दादर व सावंतवाडी ते दादर अशा दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑगस्टला सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा या सर्व दहा रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि जिल्ह्यामध्ये न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध रेल्वेस्थानकांवर कायमस्वरूपी थांबा मिळावा, यासाठी संघटनेमार्फत मागील तीन वर्षापासून मागणी केली जात आहे.
यासाठी विविध लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला तसेच उपोषण करून लक्ष वेधण्यात आले तरीही अद्याप मागण्याची पूर्तता झालेली नाही. २७ऑगस्ट २०२५ पासून कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकही गाडीची बुकिंग शिल्लक राहिलेली नाही. तरी गणेशोत्सवासाठी २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधी मडुरे ते दादर व सावंतवाडी ते दादर अशा दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दोन्ही गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात.
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकासह वैभववाडी व नांदगाव रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकीची सुविधा तात्काळ सुरू करावी. जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वेस्थानक असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर लांब पल्ल्याच्या किमान पंधरा गाड्यांना थांबा मिळावा, सावंतवाडी रेल्वेस्थानकाचे सावंतवाडी टर्मिनस असे नामकरण करावे, सिंधुदुर्गातील सर्व रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन तात्काळ सुरू कराव्यात, प्लॅटफॉर्म सुविधा नसलेल्या सर्व रेल्वेस्थानकावर. प्लॅटफॉर्म सुविधा निर्माण करावी अशा विविध मागण्या या निवेदनातून केले आहेत.
… तर एक ऑगस्टला आंदोलन ! – या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, आणि संघर्ष समितीच्यावतीने १ ऑगस्टला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्रवासी, नागरिक, लोकप्रतिनिधींनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे, आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर यांनी केले आहे.. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना, संघटनेचे उपाध्यक्ष परशुराम परब, शुभम परब, स्वप्नील गावडे आदी-उपस्थित होते.