हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे खेडमधील जगबुडी नदी, संगमेश्वरातील शास्त्री, सोनवी, मंडणगडमधील भारजा, राजापुरातील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाने सतर्कतचा इशारा दिला आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे निवखोल आणि मिरजोळे येथे घरावर झाड पडून मोठे नुसकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरातील तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सायंकाळी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने संगमेश्वर, मंडणगड, राजापूर, खेड येथे भरलेले पाणी ओसरले. राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने राजापूर बाजार पेठेतील व्यापारी अधिक सतर्क झाले आहेत.
सायंकाळी अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, कोदवली नदीच्या वाढलेल्या पाण्याने जवाहर चौकातील टपऱ्यांना वेढा घातला आहे. चिपळूण शहरासह तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे वाशिष्ठी नदीतील पाणीपातळी वाढली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने पुरसदृश स्थिती निर्माण झाली नाही. वाशिष्ठीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसह एनडीआरएफच्या टीमने शहरातील विविध भागांत भेटी देत पाहणी केली. संगमेश्वर तालुक्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे रामपेठ बाजार पेठेत पाणी भरले. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे जगबुडीला पूर आला. महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक दरडीचा काही भाग मध्यरात्रीच्या सुमारास खाली आल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.
रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे सरीवर येणाऱ्या पावसामुळे कुठे पाणी भरले नसले तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. रत्नागिरीतील निवखोल येथील दिलीप पवार यांच्या घरावर सकाळी पाच वाजता चिंचेचे झाड पडले. यामध्ये घराचे नुकसान झाले असून, दिलीप महादेव पवार (वय ५५), दीपाली महादेव पवार (वय ५२) यांना दुखापत झाली असून, ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिरजोळे-पाडावेवाडी येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दत्ताराम वासुदेव गावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडले. यामध्ये त्यांच्या घराचे नुकसान झाले असून, गावकर यांना दुखापत झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते. सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भरलेले पाणी ओसरले आहे.