संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वरतिठा येथे ऐन पावसाळ्यात रस्त्याची खोदाई करून केबल टाकण्याचे सुरू असलेले काम थांबवण्यात आले होते; मात्र या कामाला एका दिवसात पुन्हा सुरुवात झाल्याने सुज्ञ नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. हे काम पावसाळ्यात करण्यामागे उद्देश काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वरतिठा येथे एका खासगी कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूने खोदाई करून माती रस्त्यावर टाकण्यात येत आहे.
मार्लेश्वरतिठा येथे चिखल साचलेला आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना होत असून, अपघात होण्याची शक्यता आहे. या चिखलात दुचाकी घसरून पडत आहेत. सुदैवाने, या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडलेली नाही. भरपावसात काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विरोधात जाब विचारण्यासाठी कंपनीवर धडक देण्याची तयारी नागरिकांकडून सुरू आहे. या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. त्या पाण्याबरोबर खड्यातून काढून ठेवलेली मातीही इतरत्र पसरत आहे. त्याचा त्रास पादचाऱ्यांना होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अपघाताचे वाढले धोके – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख-साखरपा मार्गावर मार्लेश्वरतिठा येथे ऐन पावसाळ्यात रस्त्याची खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.