शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीचे काम पूर्ण झाले असून, या नाट्यगृहाचे लोकार्पण शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवशी २७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह २७ पासून रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. साडेअकरा कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांयुक्त सुसज्ज अशा नाट्यगृहाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. १९ वर्षानंतर नाट्यगृहाचा ‘पडदा’ उघडणार आहे. त्यामुळे नाट्यरसिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीला उभारी देऊन नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या संकल्पनेतून अद्ययावत नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेडवासियांना नाट्यगृह उभारून देऊ, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे. लोकार्पण कार्यक्रमाची जय्यत तयारी खेड नगरपालिकेकडून सुरू असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी खेड शहरात ठिकठिकाणी स्वागत फलक उभारण्यात आलेले आहेत.