सावली बार प्रकरणावर आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. या प्रकरणावर जो निर्णय घ्यायचा आहे, तो मुख्यमंत्रीच घेतील. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना सत्तेच्या बाहेर बसवलं आहे, त्यांनी बाहेरून वायफळ चर्चा करत राहाव्यात. आम्हाला त्याचे काही घेणं देणं नाही. आमच्यासाठी फक्त एकनाथ शिंदेच प्रायोरिटी आहेत. बिनबुडाच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नाही, असे ना. योगेश कदम यांनी खेडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. राजकीय आरोपांना ‘वेट ऍण्ड वॉच’ हेच आपले उत्तर आहे, असेही ते म्हणाले. रविवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेड दौऱ्यावर येत आहेत. स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनासाठी त्यांचा विशेष दौरा होणार आहे. हा कार्यक्रम स्थानिक राजकीय आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याबाबतची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना योगेश कदम यांनी अलीकडील राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, वायफळ चर्चा करून चर्चेत राहाण्यासाठी काही लोक काहीही वक्तव्य करतात. त्यांच्या बोलण्याने मराठी भाषेला किंवा समाजाला काहीही फरक पडत नाही. मराठी भाषा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. मी त्या दृष्टीने काम करतो. दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे आव्हान दिले होते. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कदम यांनी सांगितले, या संदर्भात सध्या वेट अॅण्ड वॉच भूमिका आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. या विधानामुळे आगामी काही दिवसांत कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दौरा, नवीन सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन आणि हक्कभंग प्रकरण यामुळे खेड पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येत आहे.