मुंबई-गोवा महामार्गावरून एलपी गॅसची वाहतूक करणारा टँकर हातखंबा येथील पुलावरून सोमवारी मध्यरात्री भरवस्तीजवळील नदीत कोसळला. त्यानंतर त्यामधून वायूगळती सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली. त्यामुळे रात्रौ उशीरा खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या परिसरात राहणाऱ्या शेकडो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दरम्यान सोमवारी रात्री ११.१५ वा. च्या सुमारास हा अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास म्हणजेच जवळपास १५ तासांनंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात पोलीस आणि प्रशासनाला यश मिळाले. तोपर्यंत महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक महिन्यांपूर्वी बावनदी परिसरात असाच एक अपघात झाला होता. त्या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक २४ तासांहून अधिक काळ बंद होती. मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली होती. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच सोमवारी रात्री असाच एक अपघात हातखंबा गावात झाला आणि परिसरात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
पुलावरून थेट नदीत – अधिक वृत्त असे की, जयगड येथून एलपी गॅस भरून हा गॅस टँकर गोव्याच्या दिशेने निघाला होता. सोमवारी रात्री ११.१५ वा. च्या सुमारास तो हातखंबा गावातील पुलावर आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा टँकर थेट नदीत कोसळला. नदीच्या आसपास मोठी लोकवस्ती आहे. टँकर नदीत कोसळताच झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिक आवाजाच्या दिशेने धावत आले. तेव्हा टँकर नदीत कोसळल्याचे त्यांना दिसले.
गॅस गळती – अपघातग्रस्त टँकरमध्ये असलेला गॅस बाहेर पडू लागला. त्यामुळे तेथे जाणे धोकादायक बनले होते. गॅसवाहू टँकरच्या टाकीचा एक नॉब निकामी झाला आणि त्यातून गॅस बाहेर येवू लागला. परिसरात गॅसची दुर्गंधी पसरली आणि त्याचा त्रासही काही जणांना जाणवू लागल्याची चर्चा तेथे सुरू होती. अपघाताच्या दिशेने धावणाऱ्या गावकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी अन्य ठिकाणी धाव घेतली. काही तरूण मात्र धाडसाने मदतीसाठी पुढे धावले.
जिल्हा प्रशासनाशी संपर्क – या अपघाताची माहिती तत्काळ उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांना माजी जि.प. सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप आणि सचिन देसाई यांनी दूरध्वनीवरून दिली. ही माहिती मिळताच प्रांत जीवन देसाई यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली.
यंत्रणा धावली – गॅसचा टँकर पलटी झाला आहे ही माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. काही वेळातच सारे हातखंबा येथे पोहोचले. स्वतः जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, अग्निशमन दलाचे अधिकारी, आरटीओचे अधिकारी आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा तत्काळ आढावा घेण्यात आला.
चालक जखमी – या अपघातात टँकरचालक जखमी झाल्याने त्याला गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून या जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले आणि तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली.
आधी वाहतूक रोखली – परिसरात गॅसगळती होण्याची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. गॅसची दुर्गंधीदेखील पसरली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडेल ही भीती ओळखून पोलीसांनी तत्काळ मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला. अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली. हातखंबा तिठा आणि हातखंबा महामार्ग पोलीस चौकी आदी ठिकाणी पोलीसांची विशेष टीम तैनात करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
हलक्या वाहनांसाठी दुसरा मार्ग – जी हलकी वाहने होती, ती झरेवाडीमार्गे रत्नागिरी तसेच रत्नागिरीतून जाणारी वाहनेही हरचेरीमार्गे वळविण्यात आली. मुंबईच्यादिशेने येणारी हलकी वाहने चरवेलीमार्गे बावनदीकडे वळविण्यात आली. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वीज बंद – गॅसगळती झाल्यानंतर वीजेचे स्पार्किंग झाल्यास स्फोट होऊ शकेल या शक्यतेने तत्काळ परिसरतील वीजप्रवाह बंद करण्यात आला. प्रत्येक पोलीसाच्या हातात बॅटरी होती आणि बॅटरीच्या प्रकाशात पोलीसांनी यशस्वीरित्या आपली मोहिम सुरू ठेवली.
शेकडो लोकांना हलविले – कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अपघातग्रस्त परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी सुरक्षेच्यादृष्टीने एका सभागृहात हलविले. जोपर्यंत पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत कोणीही सभागृह सोडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनीदेखील प्रशासनाला मोठे सहकार्य केले.
रात्री २ वाजता टीम आली – अपघातग्रस्त टँकरमधून गॅस सुरक्षितरित्या दुसऱ्या टँकरमध्ये भरता येईल का हे पाहण्यासाठी जिंदाल कंपनीची एका टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यासाठी प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जिंदाल प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. तत्काळ आपली टीम घटनास्थळी पाठवा अशा सूचना केल्या. त्यानंतर रात्री २ वाजता जिंदालची टीम घटनास्थळी दाखल झाली.
नॉब दुरूस्त केला – अपघातग्रस्त टँकरचा जो नॉब अपघातामुळे निकामी झाला होता, तो नॉब या टीमने दुरूस्त केला. त्यानंतर टैंकर क्रेनच्या साहाय्याने उचलण्याबाबत विचारविनिमय सुरू झाला. मात्र गॅस भरलेल्या अवस्थेत टँकर उचलणे सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरेल असे पोलीसांचे मत पडल्याने टँकरम धून गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्याचा निर्णय घेण्यात आला. हाय प्रेशर पाईपच्या मदतीने सकाळच्यावेळी हा गॅस ट्रान्सफर करण्यात आला.
सुटकेचा निःश्वास – रिकाम्या टँकरमध्ये गॅस भरण्याचा प्रयोग दुपारी २ वाजण्याच्या सुमारास यशस्वी ठरला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर अपघातग्रस्त टैंकर क्रेनच्या माध्यमाने वर काढण्यात आला. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन या दोघांनी अतिशय समन्वयाने काम करत परिस्थिती हाताळली. स्वतः जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बागाटे हे जातीनिशी घटनास्थळी उपस्थित होते.
१५ तास महामार्ग बंद – या अपघातानंतर पोलीसांनी महामार्ग तत्काळ बंद केला होता. अवजड वाहनांना हातखंबा तिठा येथे रोखण्यात आले होते. जोपर्यंत अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरला जात नाही तोपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला होता. मंगळवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास म्हणजेच जवळपास १५ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याआधी पर्यायी मार्गाने गाड्या वळविण्यात आल्या असल्या तरीदेखील महामार्गाच्या दुतर्फा अनेक गाड्यांच्या विशेषतः अवजड वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत होते.