वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी दुसऱ्या दिवशीही दाभोळ खाडीत शोध सुरू होता. खाडीकिनारील सर्व गावांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली होती. एनडीआरएफ पथकासह अहिरे यांच्या नातेवाईकांनी बोटीच्या माध्यमातून खाडीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. लग्नाला जेमतेम ३ महिने झाले नाहीत तोच या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचचले? याचेही गूढ कायम आहे. मुळचे साक्री धुळे येथील निलेश अहिरे व पत्नी अश्विनी अहिरे यांनी गांधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली होती. तेव्हापासून एनडीआरएफ पथक, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, अहिरे यांचे नातेवाईक वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत त्यांचा शोध घेत आहेत.
मे मध्ये विवाह – गावातील अश्विनी हिच्यासोबत त्याचा मे २०२५ मध्ये विवाह झाला. दोघांचाही चांगला संसार सुरू होता. अश्विनीची आई, मामा देखील येथे काही दिवस राहिले होते. सर्व सुरळीत असल्याने २ जुलैनंतर आई गावाकडे निघून गेली. बुधवारी ३० रोजी निलेश हा नेहमीच्या वेळेत मोबाईल शॉपीमध्ये आला होता. सकाळीच त्याच्याशी नातेवाईकांनी संपर्क साधून घरी जाऊन येण्यास सांगितले. तत्काळ त्याने घर गाठले असता तेथे पत्नी घरी नसल्याचे निदर्शनास आले. तिचा शोध घेतला असता ती गांधारेश्वर पुलावर असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. ‘दरम्यान निलेशनेही दुचाकीने गांधारेश्वर पुलावर धाव घेत पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. पत्नीने आत्महत्या केली असावी, या संशयातून त्यानेही नदीत उडी मारण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जाते.
जेमतेम ३ महिन्याचा संसार – या नवदाम्पत्याचा संसार सुरू होऊन अवघे ३ च महिने झाले होते. विवाहानंतर जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी ते फिरायलादेखील गेले होते. अशा परिस्थितीत या दाम्पत्याने नदीत उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.