मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, प्रवाशांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून लोकप्रतिनिधीही प्रवास करतात. काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनीही महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी गणेशोत्सवापूर्वी तरी होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांसह नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे थर उखडून गेले आहेत. काही ठिकाणी मातीचे ढिगारे रस्ता उंचवतात, तर ठिकठिकाणी खोलगट खड्डे जीवघेणे ठरत आहेत. पावसामुळे खड्यांमध्ये पाणी साचून ते आणखी धोकादायक बनले आहेत. धावत्या वाहनांमुळे हे मातीमिश्रित पाणी पादचाऱ्यांवर उडत असल्याने वादावादीचे प्रसंगही वाढले आहेत. परिणामी, चारचाकी, दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या प्रवासात तर अपघाताच्या धोक्याची शक्यता अधिक असते. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. काहीवेळा वाहनांचे टायर, इंजिन व इतर भागांचे नुकसान होत आहे. प्रवासात खोळंबा हा नित्याचाच भाग झाला आहे. अर्धवट काम, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, पावसाळ्याआधी नियोजनाचा अभाव, यामुळे हा महामार्ग रखडला आहे. प्रशासन व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष ही परिस्थिती अधिकच भयावह करणारी आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काही जखमी व कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. वाहनांचे टायर, इंजिनचे नुकसान होणे, प्रवासात खोळंबा होणे हे प्रकार नेहमीचेच झाले आहेत.