मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या काजू बी प्रक्रिया कारखान्याच्या इमारतीला शनिवारी (ता. २) सकाळी आग लागली. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामध्ये सुमारे ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी बंद असलेल्या या इमारतीतून धुराचे लोळ दिसू लागले व नंतर भडकलेल्या आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या व काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. बांबाडे यांच्या या कारखान्यातील काजू सोलण्याच्या किमती असलेल्या मशिनरींचा संच तसेच सुक्या काजू बिया सुमारे तीन टन, दरवाजे, खिडक्या, शटर व अन्य सामान आगीत जळून खाक झाले. आग लागल्यानंतर आतमध्ये ठेवलेल्या सुक्या काजू बियांनी पेट घेतला व बी पेटत असताना बीच्या तेलामुळे अधिकच आगीचा आगडोंब झाला.
आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना या ज्वालांना तोंड देणे कठीण होत होते. काजू बिया असल्याने आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर देवरूख नगरपंचायतीकडून आलेल्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. अग्निशमन बंब दाखल होण्यापूर्वी आग स्थानिक ग्रामस्थांनीसुद्धा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्राम महसूल अधिकारी विलास घोलप, संदेश घाग, पोलिस पाटील अनंत पाध्ये, सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, प्रकाश रांजणे, सुरेश साळवी, हरिश्चंद्र गुरव, पोलिस ठाणे अंमलदार जाधव, लोखंडे तसेच गावातील असंख्य ग्रामस्थसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
याचे झाले नुकसान – आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नसून, या आगीत स्टीम कुकर, काजू ड्रायर मशीन, ऑटोमॅटिक काजू कटर मशीन, पोलिंग मशीन, कॉम्प्रेसर हॅन्ड कटर, ग्रॅण्डिंग मशीन, मॉश्वर ड्रायर तसेच तीन टन मिक्स काजूगर व सुमारे सात टन रॉ मटेरिअल तसेच इमारतीचे नुकसान झाल्याचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. घोलप यांनी सांगितले. एकूण ७२ लाख ५१ हजार २६७ रुपयांचे नुकसान झाल्याचे पंच यादीत नमूद केले आहे.