राजकारणासह उद्योग क्षेत्रातील अनेकांचे मार्गदर्शक, बुजुर्ग नेते, प्रसिध्द व्यावसायिक आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त येथे कळताच खेड शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे तीन भाऊ व त्यांचे कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मंगळवारी सहजीवन शिक्षण संस्थेच्या शाळा बंद ठेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जवळचे स्नेही कौस्तुभबुटाला यांचे ते वडील होत. हिराभाई बुटाला यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
किराणा मालाचे व्यापारी – खेडमध्ये किराणा मालाचे व्यापारी म्हणुन त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायाबरोबरच ते राजकारणातही सक्रिय होते. खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यानंतर १९८५ ते १९९० पर्यंत ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभा करण्यात हिराभाईंचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांना प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला होता. त्यांचे राज्यातील अनेक जुन्या दिग्गज नेते मंडळी यांच्याशी जवळचे संबंध होते.
दिग्गजांशी निकटचे संबंध – माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, लोकनेते, माजी मुख्यमंत्री खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कै. भाईसाहेब सावंत, माजी कायदा मंत्री कै. हुसेन दलवाई यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते १९७३ पासून आजतागायत सलग ५२ वर्षे या संस्थेच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. खेड तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्थांच्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता.
शिक्षण संस्थांची आदरांजली – त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच खेडमध्ये शोककळा पसरली. सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आय सी.एस. महाविद्यालय, हिराचंद पर्शुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट खेड, सहजीवन प्रायमरी स्कूल, खंड या शाळांमध्ये हिराभाईंना श्रध्दांजली वाहून शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले होते. हिराभाईंच्या पार्थिवावर नेरुळ येथे सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दशानेमा गुजर समाजातील समाज बांधव तसेच विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हिराभाई बुटाला यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

