गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेसमध्ये उकडीचे मोदक दिले जाणार आहेत. गणपतीच्या स्वागतासाठी चाकरमानी मुंबईहून कोकणात मोठ्या संख्येने येतात. त्यांचा प्रवास अधिक आनंददायी, सस्मरणीय व्हावा यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने या उपक्रमाची घोषणा केली आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत या नावीन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे उत्साह, श्रद्धा आणि प्रेम यांचा संगम म्हणूनच ओळखला जातो. भारतीय रेल्वेने यंदा चाकरमान्यांसाठी आगळावेगळा निर्णय घेतला आहे. २७ऑगस्टपासून गणेश चतुर्थी साजरी होत आहे. त्यानंतर ६ सप्टेंबरपर्यंत अनंत चतुर्दशी आहे.
प्रवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी आणि प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसमध्ये उकडीचे मोदक प्रवाशांना सणासुदीला होणाऱ्या गर्दीचा विचार करता मुंबई, दादर, ठाणे, बोरिवली, वांद्रे आणि एलटीटी या प्रमुख रेल्वेस्थानकांवर २० रुपयांत पुरीभाजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व व्हेंडर्सना स्वच्छता, दर्जा व प्रवासी सुविधा याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. गणेशोत्सव हा केवळ सण नसून, कोकणवासीयांचा आत्मा आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी निघालेल्या प्रवाशाला प्रवासातच प्रसादस्वरूप मोदक मिळणार हेच रेल्वेच्या सेवाभावाचे प्रतीक ठरणार आहे.