हर्णे बंदरात १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला सुरुवातीस केवळ ५० नौकांनी मुहूर्त केला. दुसऱ्याच दिवशी पापलेट, बोंबिल, कोळंबी आदी मासळीची आवक सुरू झाली असली तरी अपेक्षित दर न मिळाल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या सुमारे २०० ते २५० नौका मासेमारीला उतरल्या असूनही मासळीची उपलब्धता कमी आणि खर्च जास्त असल्याने मच्छीमारांचा नफा कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला आलेल्या पापलेटला प्रतिकिलो ७०० ते ७५० रुपये दर मिळत होता; मात्र, दोन दिवसांतच तो दर घसरून ६०० रुपयांवर आला आणि आता केवळ ५०० रुपयांवर आला आहे. बाजारात येणाऱ्या पापलेट मासळीचे वजन खूपच कमी असल्याने दर घसरणे ही मोठी समस्या बनली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, वजनाने लहान मासळीला ग्राहकांकडून मागणी कमी असते त्यामुळे दर टिकत नाही.
गेल्या चार दिवसांत आणखी काही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत; मात्र, मासळीची कमतरता असल्यामुळे एक नौका किमान आठ दिवसांच्या प्रवासानंतर बंदरात परत येते तेही अत्यल्प मासळी घेऊन येते. यामुळे इंधन, बर्फ, मजुरी, उपकरणे या सर्वांचा खर्च भागवणे अशक्य झाले आहे. काही नौका म्हाकूळ आणि बग्गा मासळी घेऊन येत आहेत. मासळी व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे; पण या मासळीचा दर अद्याप जाहीर केलेला नाही. मच्छीमारांनी व्यापाऱ्यांना मासळी थेट वजनावर दिली आहे; मात्र, दर न मिळाल्यामुळे उत्पन्नात मोठी तूट येत आहे. सध्या मासेमारी हंगामातील सर्वाधिक सक्रिय कालावधी चालू असून, पुढील दोन आठवडेच कामासाठी शिल्लक आहेत. याच काळात मिळणाऱ्या उत्पन्नावर मच्छीमारांचे गणेशोत्सवाची खरेदी-विक्री अवलंबून आहे.