मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदीदरम्यान सुरू असलेल्या ढिसाळ कारभाराबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात समन्वय बैठक झाली. त्यानंतर पुढील कार्यवाही अद्याप न झाल्यामुळे ११ ऑगस्टला सोनवी पुलाशेजारी उपोषण करणार असल्याचे राहुल गुरव यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ढिसाळ झालेल्या कामकाजामुळे त्रस्त नागरिकांनी २६ जुलैला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. वारंवार होणारे अपघात आणि वाहतूककोंडी याबाबत संताप व्यक्त केला.
त्या वेळी १ ऑगस्टला आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत महामार्गाची पाहणी करण्याचे निश्चित झाले होते; मात्र तो दौरा पुढे ढकलण्यात आला. ४ ऑगस्टला पाहणी झाली; पण त्या वेळीही ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. याबाबत आंदोलकांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा निव्वळ वेळकाढूपणा असून, जनतेच्या जिवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता माघार घेणार नाही. आंदोलन आणि उपोषण करूनच न्याय मिळवू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. ११ ऑगस्टला सोनवी पुलाशेजारी उपोषण करणार असल्याचे निवेदन राहुल गुरव यांनी प्रशासनाला दिले आहे.