मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरी प्रकरणी दिल्ली येथे इंडिया आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी बळाचा वापर करून खासदारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग व तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही वेळ काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन केले. तर ‘वोट ‘चोरी के खिलाफ मै राहुल गांधी के साथ हूं!’ फलकावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. देशभरातील मतदारयाद्यांमध्ये घोळ घालत निवडणूक आयोगांच्या मदतीने भाजप मतांची चोरी करून सत्ता संपादन करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे सोमवारी मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरी विरोधात संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मात्र, यावेळी पोलिसांनी खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी केला आहे. बळाचा वापर करीत धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या विरोधात येथील काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘राहुल गांधी यांचा विजय असो! नहीं चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी! अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी ‘लोकतंत्र को बचाने की लढाई मे भागीदार बने!’ ‘वोट चोरी एक्सपोज’, ‘चीफ मिनिस्टर नाही थिफ मिनिस्टर’, अशा आशयाचे फलक हाती धरण्यात आले होते. यानंतर घोषणा देत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तर ‘वोट चोरी के खिलाफ मै’! ‘राहुल गांधी के साथ हूं!’ या अंतर्गत फलकावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यानंतर सोनललक्ष्मी घाग, लियाकत शाह यांच्याशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वोट चोरी विरोधात आपली मते मांडली.
यावेळी ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरोह, काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष अजीम सुर्वे, चिपळूण शहराध्यक्ष संतोष सावंतदेसाई, माजी नगरसेवक कबीर काद्री, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व ओबीसी प्रदेश सचिव संजय जाधव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण, काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. निर्मला जाधव, शहराध्यक्षा वीणा जावकर, खेड महिला आघाडी तालुकाध्यक्षा राबिया जसनाईक, माजी नगरसेवक सुरेश राऊत, माजी नगरसेविका सफा गोठे, सुबोध देसाई, सुरेश पाथरे, रफिक मोडक, डॉ. सरफराज गोठे, महामूद पालेकर, प्रफुल्ल शेवरकर, लियाकत शेख, दांदा आखाडे, यशवंत फके, इम्तियाज कडू, कमलेश देसाई, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, आदी उपस्थित होते.