रत्नागिरी शहरात सध्या मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. काल (ता. १२) सायंकाळी जयस्तंभ येथे भररस्त्यामध्ये दोन बैलांमध्ये लागलेल्या झुंजीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. बैलांची झुंज थेट दुचाकीवर गेल्याने अपघातही झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या मोकाट गुरांबाबतच्या उपाययोजना तोकड्या पडत असून, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पकडलेल्या गुरांना दोन महिने पालिका सांभाळत आहे. निवारा केंद्रामध्ये अजूनही ४५ मोकाट गुरं आहेत. त्यांचे करायचे काय? असा प्रश्न आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये १७०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असले तरी त्यांची दहशत कायम असल्याने पालिकेसमोर हे मोठे आव्हान बनले आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळात मोकाट गुरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघातांचा धोका वाढला आहे. पालिकेने गेल्या दीड महिन्यात ६५ गुरांना पकडून कोंडवाड्यात डांबले होते.
गुरांची देखभाल करण्यासाठी चंपक मैदानाजवळ तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पालिकेच्या निवाराशेडमध्ये ४५ गुरे आहेत. त्यांना चारा आणि पाण्याची सोय केली जात आहे; मात्र, गुरांची संख्या वाढत असल्याने त्यांची योग्य देखभाल करणे पालिकेपुढे आव्हान आहे. पकडलेली काही गुरे गोशाळेत पाठवण्यात आली आहेत; परंतु पुन्हा मोकाट गुरांच्या झुंडी शहरात येतच आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे काल जयस्तंभयेथे दोन बैलांमध्ये झुंज लागली. सर्कलमध्ये ही झुंज सुरू होती. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर बैल धडकून अपघात होत झाले. पार्किंगला लावलेल्या दुचाकीवर ही झुंज गेल्यामुळे दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मोकाट गुरे अचानक रस्त्यावर येत आहेत. रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारक, व्यापारी, नागरिक यामुळे त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
कायमस्वरूपी उपाययोजना करा – शहरातील मोकाट जनावरे आणि भटकी कुत्रे या दोन्ही समस्यांवर केवळ तात्पुरत्या मोहिमा राबवून उपयोग नाही. यासाठी एक दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे. यात कोंडवाड्याची क्षमता वाढवणे, गुरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणे आणि भटक्या कुत्र्यांसाठी योग्य निवाराकेंद्र उभारणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश असायला हवा.