जिल्हा प्रशासनाने नाकारलेल्या जागेचे खरेदीखत कसे केले जाते? तसेच त्याचा ठराव कसा केला जातो? हे बेकायदेशीर नाही का? या जागेची ६ कोटी ३६ लाख रुपयांना प्रशासनाकडून खरेदी केली जाते. याला जबाबदार कोण? अशा विविध प्रश्नांची कोत्रेवाडी नागरिक मंगेश आंबेकर यांनी कोत्रेवाडी नागरिकांच्यावतीने मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यावर सरबत्ती केली. यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कोत्रेवाडीतील नागरिक डंपिंग प्रकल्पाबाबत १४ ऑगस्टपासून उपोषण करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नाही. तसेच जवळच जलस्त्रोत आहेत. असे असतानादेखील प्रकल्प राबविला जात असल्याने कोत्रेवाडी नागरिकांच्यावतीने गुरुवार दि. १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण छेडण्यात आले आहे.
मुख्याधिकाऱ्यांसमवेत बैठक – या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या समवेत ग्रामस्थांची बैठक गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी नागरिकांच्यावतीने भूमिका मांडताना मंगेश आंबेकर यांनी सांगितले की, कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डंपिंग ग्राउंड प्रकल्प राबविला जात आहे. या विरोधात वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला आहे. वेळोवेळी आपल्याकडे निवेदने सादर केली आहेत. त्यामुळे हा कचरा प्रकल्प हटविणार कधी? मुळातच हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. कोत्रेवाडीतील ही नियोजित जागा जिल्हा प्रशासनाने अयोग्य ठरविलेली आहे. जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा निवड समितीने ही जागा २०१६ च्या निकषात बसत नाही असे देखील पत्र दिले होते. हे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून आपण स्वतः लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले होते.
खरेदीखत बेकायदेशीर ? – जिल्हा निवड समितीने आणि आपण स्वतः जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून ही जागा नाकारलेली असतानादेखील त्यानंतर जागेचे खरेदीखत केले व तसा ठराव देखील केला. हे बेकायदेशीर नाही का? नाकारलेली जागा त्यानंतर योग्य कशी झाली? आणि ६ कोटी ३६ लाख रुपये कोणाचे गेले? शासनाचे आणि पर्यायाने आम्हा जनतेचे पैसे वाया गेले आहेत. त्याला जबाबदार कोण? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न मंगेश आंबेकर यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले.
आजपासून उपोषण – जिल्हा प्रशासन ही जागा अयोग्य ठरवत असेल तर त्या जागेची खरेदी कशी केली जाते? त्याला मंजुरी कशी दिली जाते? या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे कोत्रेवाडी नागरिकांचे मत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस आणि समर्पक उत्तरे न मिळाल्याने कोत्रेवाडी नागरिक दि. १४ ऑगस्टपासुन उपोषण करण्यावर ठाम राहिले आहेत.