तळकोकणामध्ये दाखल होण्यासाठीच्या हायवेची दुरावस्था झाली आहे. मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण एक्सप्रेस वे प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मुंबईकरांना व्हाया वरळी थेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांमध्ये पोहोचता येणार आहे. सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरु आहे. मुंबईमधून कोकणात जाण्यासाठी सध्या वाहनचालक आणि प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महामार्गाचे काम रखडल्याने हा प्रवास अजूनच त्रासदायक बनतो आहे. अशा वेळी भविष्यात तयार होत असलेला हा कोकण एक्सप्रेस वे मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास नक्कीच आरामदायी ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण एक्सप्रेस वे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा बृहत् आराखडा तयार करण्याच्या तसेच सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली असून पुढील दोन वर्षांत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.
राज्य सरकारची या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास मंजुरी मिळाल्याबरोबरच त्वरित या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. वर्षभरात आराखड्याचे काम पूर्ण करून प्रकल्पाला आर्थिक, प्रशासकीय मंजुरी आणि इतर सर्व प्रकारच्या परवानग्या घेत, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात पुढील दोन वर्ष लागणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. काम सुरू झाल्यापासून चार ते पाच वर्षांत ते पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून २०२७-२८ मध्ये हा एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी सज्ज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे मुंबईला जाण्यासाठीचे अंतर कमी होऊन या जिल्ह्याच्या विकासाला मात्र जास्त गती मिळणार आहे.