31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeRatnagiriगणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे, चाकरमान्यांना दिलासा द्या

गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे, चाकरमान्यांना दिलासा द्या

जनशताब्दी, तुतारी आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास दिलासा मिळेल.

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केली आहे. विशेषतः जनशताब्दी, तुतारी आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजरसारख्या कायम गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे वहाळकर यांचे म्हणणे आहे. सध्या अनेक गाड्यांमध्ये आसनक्षमता कमी असल्याने प्रवाशांना आरक्षण मिळत नाही ज्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य होत नाही. जुन्या रचनेच्या गाड्यांमध्ये २४ डबे बसवता येत होते तर नव्या गाड्यांमध्ये २२ डबे आहेत. यामुळे काही गाड्यांमध्ये पूर्वर्वीपेक्षा कमी डबे असल्याने गर्दीची समस्या वाढली आहे. सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ही गाडी सध्या १७ डब्यांची धावते आणि कायम हाऊसफुल्ल असते. यात आणखी ५ डबे वाढवल्यास ती २२ डब्यांची होईल, ज्यामुळे जवळपास ५००हून अधिक प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल.

जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी दिवसा धावणारी असून, प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती नेहमीच पूर्ण भरलेली असते. सध्या १६ डब्यांची असलेल्या या गाडीत ५ ते ६ डबे वाढवल्यास जवळपास ३०० ते ४०० प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते. वाढीव डब्यांसह १९ किंवा २० डब्यांची जनशताब्दी तिच्या वेगात कोणताही बदल न होता धावू शकेल. सावंतवाडी ते दादर धावणारी तुतारी एक्स्प्रेस ही गाडी कोकणवासीयांसाठी महत्त्वाची आहे आणि तिला नेहमीच प्रचंड गर्दी असते. सध्या १९ डब्यांची असलेली ही जुन्या डब्यांची गाडी आहे. यात अतिरिक्त ५ डबे वाढवून ती २४ डब्यांची केल्यास ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची सोय होऊ शकेल.

हंगामी गाड्यांमुळे विलंब – सणासुदीच्या काळात आणि सुट्यामध्ये सोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. यामुळे नियमित वेळेवर धावणाऱ्या गाड्यांना एक ते दोन तास उशीर होतो आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. या समस्येवरही तोडगा काढण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular