कोणी कोणत्या पक्षात जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रशांत यादव कुठेही गेले त्याचे उत्तर काळ ठरवेल. कोणाची किती ताकद आहे हे येणाऱ्या काळात दिसेल, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन निधीवाटपात पालकमंत्री दुजाभाव करत आहेत. मीही सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहे. तिथेही याचे पडसाद उमटतील, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला होता. त्यावर उत्तर देणे सामंत यांनी टाळले; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, असे स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, निवडणुकांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. त्या समितीमध्ये मी स्वतः आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात आपली दोन तास चर्चा झाली आहे. मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता चव्हाण यांना याची माहिती आहे.
महायुती म्हणून मित्रपक्षाचा सन्मान ठेवला जाईल. समन्वय समितीत काय चर्चा होते, हे समिती सदस्यांनाच माहीत असते. बाहेरच्यांना त्याची माहिती नसते. कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी नीतेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर त्याची आपल्याला माहिती नाही. मी चारवेळा मंत्री झालो आहे. त्यामुळे कुठे काय बोलायचे याचे ज्ञान मला असल्याचा टोला सामंत यांनी लगावला. सामंत म्हणाले, रत्नागिरीतील सण-उत्सवांमध्ये सर्व जातिधर्माचे लोक एकत्र येतात. ही धार्मिक सलोख्याची परंपरा कायम राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आपत्कालीन मदतीसाठी सेवाभावी संस्था तयार असून त्यांचा आढावा घेतला जाईल. काही गैरप्रकार झाल्याबद्दल संबंधित यंत्रणा चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई होईल.
सरकारला समजून घ्या… – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे, जे न्यायालयात टिकलेले आहे. सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार आहे; पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अशीही सरकारची भूमिका आहे. या संदर्भात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना शासनाची भूमिका समजून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
चार तासांत मुंबईहून रत्नागिरीत – महामार्गाचे काम उशिरा झाले आहे, हे आम्ही मान्य करतो. ज्याप्रमाणे आम्ही चांगल्या कामाचे श्रेय घेतो त्याचप्रमाणे या विलंबाची जबाबदारीही आम्ही स्वीकारतो. महामार्गाच्या ३५४ किलोमीटरपैकी केवळ २१ किलोमीटरचे काम शिल्लक आहे. यापैकी ४ किलोमीटरवर टोल बसवण्याचे’ काम बाकी आहे. पुढच्या वर्षापासून मुंबईहून रत्नागिरीला येण्यासाठी फक्त ४ तास लागतील आणि सिंधुदुर्गला जाण्यासाठी साडेपाच तास लागतील, असा रस्ता तयार झालेला असेल, असा विश्वास सामंत यांनी दिला.