मागील वर्षी कोरोनाचे संकट आणि या वर्षी वादळ, अतिवृष्टीमुळे चिपळूणमध्ये उडालेला महापुराचा हाहाकार त्यामुळे, सर्व सामान्य जनता होरपळून निघाली आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात यायला लागली तर नैसर्गिक आपत्तींमुळे व्यापारी आणि जनता हवालदिल झाली आहे.
२२ जुलै रोजी उद्भवलेल्या महापुराने तर चिपळूण, खेड येथील जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. या कठीण काळातून सावरत असताना महावितरणाने वीजबिल वसुलीसाठी जबरदस्ती करू नये अशी मागणी चिपळूण व्यापारी महासंघटनेच्यावतीने महावितरणाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन आज व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर रेडीज, मार्गदर्शक अरुण शेठ भोजने, सचिव उदय ओतारी यांनी महावितरणला दिले.
चिपळूणच्या महापुरामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, अनेक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक कागदपत्रे खराब झालीत तर काही वाहून गेलीत. त्यामुळे पुराच्या धक्क्यातून सावरत असताना, अजून शासनाची पुरेशी मदत सुद्धा मिळाली नसताना, थकीत वीजबील भरण्यासाठी महावितरणाने लावलेला तगादा त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. व्यापाऱ्यांचे सुद्धा पुराच्या पाण्याने दुकानातील सर्व माल खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये आता महावितरणाने वीजबील वसुलीची कारवाई सुरु केली असल्याने बिलाची रक्कम ४ हप्त्यात घ्यावी, कापलेली कनेक्शन पुन्हा जोडून द्यावीत, वीज ग्राहकांना त्रास होईल अशी वागणूक देऊ नये अशा विविध मागण्या देखील या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे महावितरणने जर याबाबत सहकार्य न केले नाही तर चिपळूण वासियांमध्ये उद्भवणाऱ्या प्रकोपास सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा सूचक इशारा चिपळूण व्यापारी महासंघटनेकडून देण्यात आला आहे.