रत्नागिरी जिल्ह्यातील एका नावाजलेल्या बँकेमध्ये बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. दरम्यान बोगस कर्ज प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच बँकेने दिलेल्या यादीनुसार, थकित कर्जदारांना सहकार उपनिबंधक कार्यालयाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून १० सप्टेंबरला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे. आता १० सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये नेमके काय होते? याकडे लक्ष लागले आहे. गेले अनेक दिवस या बड्या, नावाजलेल्या बँकेतील बोगस कर्ज प्रकरणाची चर्चा रत्नागिरीच्या बँक आणि व्यावसायिक वर्तुळात सुरू आहे. अनेकांच्या नावावर लाखो रूपयांची बोगस कर्जे काढली गेल्याची चर्चा जवळपास महिनाभर सुरू आहे. दरम्यान आपल्या थकीत कर्जाची वसूलीची मोहिम बँकेने हाती घेतली. त्यानंतर अपेक्षित अशी वसूली न झाल्याने बँकेच्यावतीने थेट सहकार उपनिबंधकांकडे थकित कर्जदारांची यादी पाठविण्यात आली. त्याची दखल घेत संबंधितांना नोटीसा पाठविण्यात आल्या आणि त्यानंतर या बोगस कर्ज प्रकरणांची चर्चा अधिकंच जोरात सुरू झाली.
नोटीस पाहून डोळे पांढरे – आपण कर्ज घेतलेले नसताना आपल्याला नोटीस आल्याचे पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले. अनेकांना धक्का बसला, त्यातील काही जणांनी सहकार उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून आपण कर्ज घेतलेले नाही, अशा तक्रारी केल्या आहेत. याबाबत काही कर्जदारांनी पत्रकारांनाही त्याबाबतची माहिती दिली आहे. दस्तुरखुद्द सहकार उपनिबंधकांनी याची दखल घेत १० सप्टेंबरला त्यांनी या सर्वांना सुनावणीसाठी बोलावले आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
जामीदारही बोगस – अनेकांच्या नावावर वैयक्तिक कर्ज काढण्यात आल्याचे आरोप होत आहेत. जसे कर्जदार बोगस आहेत, तसेच जामीनदारही बोगस असल्याची चर्चा सुरू आहे. नोटीस येताच काही जामीनदारांनीही सहकार खात्याशी संपर्क साधून आपण कुणालाही जामीन राहिलेलो नाही, असे सांगितल्याचे कळते. त्यांनाही १० सप्टेंबरला बोलावण्यात आले आहे.
समाजभवनासाठी कर्ज ? – लाखो रूपयांची कर्जे असल्याचे चर्चिले जाते. यामध्ये एका समाजासाठी भवन उभारण्याकरिता बँकेकडून कर्ज घेण्यात आले आणि ते थकित झाल्याने तब्बल ११ लाख रूपये थकबाकी भरण्याची नोटीस संबंधितांना येताच ते हादरलेच, असेही बोलले जाते. अशी अनेक बोगस कर्जप्रकरणे चर्चेत आहेत. केवळ रत्नागिरी शहरातच नव्हे तर आसपासच्या पावस आणि परिसरातील काही व्यावसायिकांच्या नावावरही कर्ज असल्याची नोटीस येताच तेदेखील हादरले आहेत. थकित रक्कमेचा एकूण आकडा काही कोटींच्या घरात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला नेमके काय होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.