जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ३००४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आठवडाभरापूर्वी गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिमीची तफावत होती; मात्र आठ दिवसांत पडलेल्या पावसामुळे ही तफावत कमी झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३२६९ मिमीची नोंद झाली होती. त्यात १६ ते १९ या कालावधीत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या प्रमुख नद्यांना पूर आला होता. त्यात जगबुडी, नारंगी, वाशिष्ठी, शास्त्री, गडनदी, बावनदी, काजळी, कोदवली, अर्जुना नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरले होते. त्याचा फटका किनारी भागातील भातशेतीला बसला आहे. पावसामुळे सुमारे १००.६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील ९८ हेक्टर भातक्षेत्राचा समावेश आहे. उर्वरित क्षेत्रात ०.४० हेक्टर फळबागायतीचा समावेश आहे. २८८ शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकनास या पावसामुळे झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसानंतर खरीप हंगामात प्रथमच सलग पाऊस पडला होता.
त्याचे परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहेत. वाशिष्ठी, गडनदीचे पाणी अजूनही काही शेतीमध्ये तसेच असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्याबरोबर गाळ शेतामध्ये गेल्यामुळे तिथे पुनलागवड होणेही अशक्य आहे. दरम्यान, भातलावण्या पूर्ण झाल्यानंतर पाऊस पडण्याचे प्रमाण अनियमित आहे. त्यातही मोजक्याच महसुली मंडळात पाऊस चांगला पडत आहे. यावर्षी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. त्यातील ३० टक्के भातलावण्या ८ ते १० दिवस विलंबाने झाल्या. कमी पावसामुळे फुटवे म्हणावे तसे आलेले नाहीत. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.