इंधनावर महिन्याला लाखो रुपये खर्च करणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच आणखी ६० सीएनजी गाड्या दाखल होणार आहेत. रत्नागिरी विभागासाठी या गाड्या असून, चिपळूण विभागाला यापूर्वीच ३० गाड्या मंजूर आहेत. लवकरच प्रदूषणविरहित ३० ई-बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, दापोली आणि खेड आगारामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम महावितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या सुमारे ७२० बस धावतात. त्यामध्ये ३४ शिवशाही, २६ स्लिपर, ४० सिटीबसचा समावेश आहे, तर ४० बस भाड्याने घेतल्या आहेत, अशी परिस्थिती एसटी विभागाची आहे. त्यामुळे चांगल्या गाड्यांची तशी वानवाच आहे. एसटी ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. त्यात शासनाने महिलांसह वयोवृद्धांना दिलेल्या विविध योजनांमुळे प्रवाशांचा एसटीकडील कल वाढत चालला आहे.
त्यात झालेल्या भाडेवाढीमुळे एसटीच्या उत्पन्नातदेखील भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी एसटीच्या ताफ्यात आणखी ३० नवीन बसेस आल्या. हळूहळू एसटी कात टाकताना दिसत आहे. आता तर एमआयडीसीच्या माध्यमातून सर्व बसस्थानके हायटेक होत चालली आहेत. डिझेलमुळे होणारे प्रदूषण आणि महिन्याला होणारा लाखोंचा खर्च टाळण्यासाठी एसटीच्या ताफ्यात नव्याने ६० सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. चिपळूण विभागात यापूर्वीच ३० बस मंजूर आहेत. त्यासाठी एसटीच्या आगारामध्ये सीएनजी पंपांना मंजूर दिली आहे. त्यामध्येच एसटीसाठी स्वतंत्र फिलिंग यंत्रणा असणार आहे. या गाड्यांना एक किलो सीएनजीला ४ किमी अंतर कापते. या गाड्यांना २८० किमी सीएनजी टाक्यांची क्षमता आहे. त्यासाठी एसटी कॉलनीतील सीएनजी पंपाला स्वतंत्र फिलिंगची यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.
यापूर्वीच जिल्ह्याला ३० ई-बसेसची मंजूर झाल्या आहेत. यामुळे डिझेलवर होणारा सुमारे लाखो रुपयांचा खर्च कमी होणार असून, एसटीच्या उत्पन्नात भर पडणार आहे; मात्र त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. रत्नागिरीत माळनाका येथील आगारामध्ये चार्जिंग स्टेशन काम सुरू झाले आहे. महावितरण कंपनीने त्यासाठी जोडणी दिली आहे. खेड, दापोली, चिपळूण आगारात देखील हे काम सुरू आहे. चार्जिंग स्टेशनची कामं झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ३० ई-बसेस जिल्ह्याला मिळणार आहेत.