मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनादरम्यान पाली गावात शासकीय जमिनीवर असलेल्या टपऱ्या चालकांना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. पालीतील ७३ टपऱ्या चालकांना ६४ लाख ९५ हजार ४८४ रुपयांचा मोबदला मंजूर करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवा पूर्वी हा मोबदला मंजूर झाल्यामुळे टपऱ्या व खोकेधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी खासगी भुधारकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. परंतु शासकीय जागेमध्ये टपऱ्या असणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. गेली अनेक वर्ष शासकीय जागांवर हे गरीब खोकेधारक व्यवसाय करीत होते. त्यांची गुजरान या व्यवसायावर होत होती. याबाबत पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण भैय्या सामंत हे प्रयत्न करीत होते. त्यामुळे आरवली, संगमेश्वर पट्ट्यातील अनेक खोकेधारकांना याचा लाभ मिळाला ळाला होता. मात्र पाली परिसरातील खोकेधारकांना मोबदला मिळाला नव्हता.
या खोकेधारकांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. काही दिवसांपूर्वीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या बैठकीत आम. किरण सामंत यांनी पाली येथील खोकेधारकांची बाजू मांडत त्यांना मोबदला मिळावा, अशी भूमिका व्यक्त केली होती. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी याठिकाणच्या खोकेधारकांची यादीही सादर केली होती. पालीतील ७३ खोकेधारकांना ६४ लाख ९५ हजार ४८४ रुपयांचा मोबदला मंजूर झाला आहे. या मोबदल्याचे वाटप लवकरच केले जाणार आहे. प्रांताधिकारी जीवनं देसाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या सर्व खोकेधारकांची आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामंत बंधूंनी केलेल्या प्रयत्नामुळे मोबदला मंजूर झाल्यामुळे खोकेधारकांम ध्ये समाधानाचे वातावरण आहे.