25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriव्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

जिल्ह्यात मूर्ती व्यवसायातील उलाढाल आठ ते दहा कोटींवर पोचली आहे. 

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी, चिपळूण तसेच इतर प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सवापूर्वी चार दिवसांत सुमारे १५ ते २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाइनकडील कल दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात फरक दिसत आहे. तरीही ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत असल्याने गणेशाची स्थानिक व्यावसायिकावर कृपादृष्टी झाली; मात्र ऐन गणेशोत्सवात पाऊस सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालू राहील. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार आहेत. त्यांच्याकडे तयार होणाऱ्या मूर्तीसह बाजारात तयार असलेल्या मूर्तीची घरी आणून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. इंधनवाढ, मूर्ती साहित्यातील महागाई यामुळे मूर्तीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. जिल्ह्यात मूर्ती व्यवसायातील उलाढाल आठ ते दहा कोटींवर पोचली आहे.

गणेशोत्सवात सजावटीवरही अधिक खर्च केला जातो. पडदे, झुंबर, विद्युतमाळा, कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणे, मण्यांच्या माळा, चक्र, रंगीत दिव्यांची तोरणे अशा साहित्याला विशेष मागणी होती. सजावटीच्या साहित्याच्या खरेदीमुळे जिल्ह्यात आठ ते नऊ कोटींचा व्यवसाय झाला आहे. विविध प्रकारचे पेढे, मोदक, लाडू यांसह चिवडा, फरसाण यांचाही खप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक मिठाई विक्रेत्यांनी उकडीचे तसेच तळलेले सोदक खास ऑर्डर घेऊन विक्रीसाठी तयार केले आहेत. गौरीसाठी फराळाच्या पदार्थांत करंजी, विविध प्रकारचे लाडू, चकल्या, कडबोळी, चिवडा, शंकरपाळी, अनारशांना विशेष मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मिठाई व्यवसायातूनही ३० ते ३५ लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. कृत्रिम पानाफुलांचा खप चांगलाच आहे. दूर्वांच्या जुड्या, दूर्वापासून तयार केलेले हार, झेंडू, गुलाब, शेवंती, जरबेरा तसेच सजावटीसाठी डेलियाला विशेष मागणी असल्याने या क्षेत्रातही २० ते २५ लाखांचा व्यवसाय झाला आहे.

नैवेद्यासाठी केळीची पाने, हळदीची पाने, काकडी, चिबूड, नारळ यांचाही खप सर्वाधिक असल्याने त्यातूनही सुमारे पाच ते सहा लाखांचा व्यवसाय झाला. आर्थिकदृष्ट्या संपन्न भाविक दरवर्षी गणपतीला सोन्या-चांदीची आभूषणे तयार करून अर्पण करतात. चांदीचे जास्वंदी फूल, मोदक, दुर्वा, हार, त्रिशूळ, मुकूट, बाजूबंद, कमरपट्टा, पूजेसाठी पानसुपारी, तांब्या-पेला, प्रसादासाठी वाटी, ताट, करंडा, अत्तरदाणी, गुलाबपाणी भांडे खरेदी करण्यात येत होते. सर्वसामान्य ग्राहक गौरी-गणपतीसाठी इमिटेशन ज्वेलरी खरेदीवर समाधान मानत आहेत. एक ग्रॅम सोन्याच्या वस्तूंसाठी विशेष मागणी होती. त्यामुळे दागिन्यांची विक्री १० ते १५ लाखांत झाली.

वाद्य व्यावसायिकांनाही चालना – ढोलकी, नाल, पखवाज, टाळ व चकवा, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे ढोल, बेन्जोचे साहित्य, ढोलपथकांसाठी लागणारे मोठे ढोल यातून वाद्य व्यवसाय अडीच ते तीन लाखांचा झाला आहे. दिवाळीइतकी नसली तरी गणेशोत्सवातही कपडे खरेदी मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रातही सुमारे सहा लाखांचा व्यवसाय झाला.

पूजा साहित्य लखलखले – पूजेच्या साहित्यामध्ये धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती, प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी प्राधान्याने केली जाते. पूजेसाठी ताम्हण, निरजंन, समई, आरतीचे तबक, दिवा, करंडा, तांब्या पितळेच्या भांड्यासह व्हाईट मेटलची भांडी यातून पाच लाखांवर उलाढाल झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular