27.5 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeRatnagiriरेल्वे-एसटी फुल्ल, कोकणवासीयांचा खोळंबा पावसामुळे कसरत

रेल्वे-एसटी फुल्ल, कोकणवासीयांचा खोळंबा पावसामुळे कसरत

प्रवाशांकडून रेल्वेस्थानकावर शेड उभारण्याची मागणी केली जात आहे.

गौरी-गणपती विसर्जनानंतर गणेशभक्तांचा मुंबई-पुण्याकडील परतीच्या प्रवासाला मंगळवारी (ता. २) रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस असूनही एसटी, कोकण रेल्वेला प्रचंड गर्दी होती. कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा या नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसह एसटी बसेसही फुल्ल होत्या. कोरेच्या जनरल डब्यामध्ये उभे राहण्यासाठी जागा नव्हती. पावसामुळे रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांची मोठीच पंचाईत झाली होती. जिल्ह्यात सुमारे एक लाखांहून अधिक घरगुती गणपर्तीचे मंगळवारी विसर्जन झाले. गेले सात दिवस गावात आलेल्या कोकणकरांनी गणपतीची मनोभावे सेवा केली. त्यानंतर सायंकाळी गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. भरपावसात विसर्जन आटपून मुंबईकरांनी गाड्या पकडण्यासाठी धाव घेतली होती. त्यामुळे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या आजपासून हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये परतणाऱ्या रेल्वेस्थानकांवर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, निवसर, राजापूर येथील स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते.

परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे, नियमित गाड्यांसोबतच जादा रेल्वेगाड्यांनाही गर्दी होती. ९० दिवस आधी आरक्षणाची सुविधा असल्यामुळे अनेकांनी पूर्वीच तिकीट काढून ठेवले होते. त्यामुळे त्यांचा प्रवास चांगला झाला. मध्यरेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी एकूण ३५० हून अधिक विशेष रेल्वेफेऱ्यांची सोय केली होती. त्याही कमी पडल्या होत्या. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक सुविधा पुरवल्या जात होत्या. दरम्यान, कोकण रेल्वेबरोबरच एसटी बसनेही हजारो चाकरमानी शहरांकडे रवाना झाले. त्यांच्यासाठी सुमारे २२१ जादा गाड्यांची व्यवस्था रत्नागिरीतून करण्यात आली होती. आजही तेवढ्याच गाड्यांची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली होती. काल रात्री माळनाका येथील मुख्य आगाराच्याबाहेर अनेक एसटी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी बसस्थानकावर पाठवण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा चांगली सोय झालेली होती.

रेल्वेस्थानकावर शेडची गरज – मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानकावर शेड नसलेल्या भागात चाकरमान्यांना भिजत गाडीमध्ये चढण्यासाठी थांबावे लागले. याबाबतचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. प्रवाशांकडून रेल्वेस्थानकावर शेड उभारण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे भविष्यात गैरसोय होणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular