खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे माजी राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा गुरूवारी ४ सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपात होणारा प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर टाकण्यांत आला असून पुढील काही दिवसात हा प्रवेश होईल असे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकर यांना मनसेने अचानक पक्षातून बडतर्फ केले. या कारवाईने वैभव खेडेकर यांनाही मोठा धक्का बसला. ज्या पक्षासाठी २० वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो, त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे असे फळ दिल्याची भावना खेडेकर यांनी बोलून दाखवली. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार या संदर्भात चर्चा होत असतानाच मत्स्यउद्योग मंत्री ना. नितेश राणे यांनी गणेशोत्सव काळात खेडमध्ये येऊन वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब केले होते. वैभव खेडेकर यांचा दिनांक ४ सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार नारायण राणे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
यानुसार वैभव खेडेकर यांना पाठिंबा देत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदासह मनसेच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मुंबई भाजपा पक्ष प्रवेशासाठी जय्यत तयारी देखील केली होती. शेकडो समर्थकांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होता. मात्र, मराठा व ओबीसी आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष सतीश मोरे यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर आता मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचा भाजपा पक्ष प्रवेश होणार असल्याने भाजपाला अधिक बळ मिळणार असल्याचे देखील मोरे यांनी यावेळी सांगितले. वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचे भाजपा पक्षात स्वागत असून आम्ही सर्वजण भाजपा पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी पत्रकारांना दिली.
लवकरच प्रवेश करणार – याबाबत खेडमध्ये पत्रकारांशी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, भाजप प्रवेशाची तारीख ठरली होती. मात्र ना. रवींद्र चव्हाण यांनी फोन करून तुमचा प्रवेश माझ्या उपस्थितीत होईल असे सांगितले आहे. चार दिवसांनी जल्लोषात प्रवेश होईल, असे वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.