तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पादचारी ठार झाला. शिवाजी गोविंद कुळ्ये (वय ५०, रा. कुळ्येवाडी-तरवळ, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार श्रीराज प्रसाद सावंत (वय २३, रा. देसाईवाडी-मांजरे, ता. संगमेश्वर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वादंग निर्माण झाला होता. ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी तीनच्या सुमारास जाकादेवी बाजारपेठेत घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पादचारी शिवाजी कुळ्ये हे जाकादेवी बाजारपेठेत बाजारहाट करण्यासाठी गेले होते.
रस्त्यातून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वार (एमएच ०८, एल २७७९) श्रीराज सावंत याने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली. या प्रकरणी सुमित शिवाजी कुळ्ये यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार – मृत शिवाजी कुळ्ये यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच तरवळ येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. या अपघातप्रकरणी स्वाराकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आज सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात तरवळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती; परंतु सायंकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.