अणुस्कुरा घाटमार्गामध्ये सातत्याने होणाऱ्या भूस्खलनावर बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातात. परंतु, पुढीलवर्षी त्या निरुपयोगी ठरतात. या सर्व घटनांना निश्चितच नैसर्गिक कारणे आहेत. मात्र, सातत्याने होणाऱ्या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना आणि त्यासाठी घाटरस्त्याचे परिपूर्ण सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. निर्धोक अणुस्कुरा घाटरस्त्याचा मास्टर प्लॅन करून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. अणुस्कुरा घाटमार्गामध्ये पावसाळ्यात सातत्याने होणारे भूस्खलन, कोसळणाऱ्या दरडी अन् दगडी रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. मात्र, या उपाययोजना तात्पुरत्या ठरतात.
दरवर्षी भूस्खलन अन् दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर होणारा खर्च वाया जातो. घाटमार्ग कायमस्वरूपी निर्धोक होण्याच्यादृष्टीने उपाययोजनांची आवश्यकता आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र, घाटमार्गाचे संपर्काच्यादृष्टीने महत्त्व, वाढती रहदारी पाहता घाटमार्ग निर्धोक होण्यासाठी निधीची तरतूद होऊन वेळेतच त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
यामुळे होते भूस्खलन – अणुस्कुरा घाटमार्गामध्ये ज्या ठिकाणी दरड वा भूस्खलन होण्याच्या सातत्याने घटना घडतात त्या भागामध्ये माती कमी आणि कातळ म्हणजे दगडाचा भाग जास्त आहे. त्याचवेळी भूस्खलन होत असलेल्या भागामध्ये उंचच्या उंच टोकाच्या सुळक्यासारख्या दरडी आणि मोठमोठे दगड आहेत. अतिवृष्टीमध्ये कातळभाग माती सोडून देत असल्यामुळे भूस्खलनासारख्या घटना अनेक ठिकाणी घडतात. तसा प्रकार अणुस्कुरा घाटामध्येही घडत असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.