प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी जिल्ह्यात लागू झाली असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतीनंतर जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात व नाचणी पिकांसाठी २ हजार ४७ शेतकऱ्यांनी ५४२.५९ हेक्टर क्षेत्रावरील पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ४०७ शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी अर्ज दाखल केले तर १ हजार ६४० बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. पीकविम्यासाठी २.४० लाखांचे अनुदान मिळणार आहे. सर्वाधिक अर्ज खेड, दापोली, चिपळूण तालुक्यातून आले असून, सर्वात कमी लांजा, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातून आले आहेत. जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी ३१ जुलै शेवटची तारीख होती. त्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
मुदतवाढीनंतर २ हजार ४७ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत तर मागील वर्षी कर्जदार, बिगरकर्जदार मिळून १४ हजार ३२४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मागील वर्षपिक्षा यंदाच्या वर्षी पीकविम्यासाठी अर्जाची संख्या वाढली आहे. दरम्यान, या योजनेत सहभागी होण्यासठी अॅग्रीस्टॅग शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असून, पीकविमा नुकसानीसाठी ई-पीकपाहणी अंतर्गत पिकांची नोंद बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडलासाठी भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू असून, कर्जदार, बिगरकर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.