नगर पालिकेच्या वतीने रानतळे येथे उभारण्यात आलेल्या ‘पिकनिक स्पॉट’च्या सुशोभीकरणामुळे या स्पॉटचे रूपडे पालटून त्याला सौंदर्याचा नवा साज मिळाला आहे. माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या दूरदृष्टिकोन आणि विशेष प्रयत्नातून हे शक्य झाले. सुशोभीकरणामध्ये या आकर्षक रंगरंगोटी, डोळ्यात भरणाऱ्या प्रवेशद्वार यांसह सेल्फी पॉईंट, व्ह्यूटॉवरने पिकनिक स्पॉटचे सौंदर्य आणि नजाकता अधिकच खुलली आहे. नियमित धकाधकीच्या जीवनामध्ये थोडा निवांतपणा, काहीसा विरंगुळा अन् कलात्मकतता अनुभवण्याच्यादृष्टीने शहरवासीयांसाठी रानतळे पिकनिक स्पॉट निश्चितच हक्काचे ‘टुरिझम डेस्टिनेशन’ बनले आहे. धावपळीच्या जीवनामध्ये थोडासा निवांतपणा मिळावा या उद्देशाने पालिकेच्या वतीने रानतळे येथे पिकनिक स्पॉटची उभारणी करण्यात आली. माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून याची निर्मिती झाली.
त्यानंतर, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नातून लोकवस्तीपासून दूर आणि उंच भाग असलेल्या रानतळे येथील पिकनिक स्पॉटला नवा साज देण्यात आला आहे. सुशोभीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून २५ लाख आणि पर्यटन विकास योजनेतून २५ लाख असे मिळून शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. आकर्षक रंगरंगोटी, पिकनिक स्पॉटचे प्रवेशद्वार, बैठकव्यवस्था, लहान मुलांना बसण्यासाठी सुंदर जागा, झोपाळा, घसरगुंडी, कारंजे, मध्यवर्ती भागामध्ये साऱ्यांचे लक्ष वेधून घेते ती फुलपाखराची प्रतिकृती. स्वच्छ आणि सुंदर परिसर असलेल्या या पिकनिक स्पॉटमध्ये जीवनातून आलेली मरगळ निश्चितच दूर करत नवी ऊर्जा देते. ही अनुभूती मिळवण्यासाठी आपसूकच साऱ्यांची पावले पिकनिक स्पॉटकडे वळताना दिसत आहेत.
सेल्फी पॉईंट – वैशिष्ट्यपूर्ण राजापूर शहर आणि परिसराच्या निसर्गसौदर्यांची साऱ्यांनाच भुरळ घातलेली आहे. हिरव्यागार अन् निसर्गरम्य राजापूर शहरातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून धावणारी वाहने, महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा अर्जुना नदीवरील पूल एवढेच नव्हे तर राजापूर शहराच्या ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा अन् खजिन्यामध्ये भर घालणाऱ्या वास्तूंचे सौंदर्य पिकनिक स्पॉटमध्ये बसून मनसोक्तपणे अनुभवता येते. पिकनिक स्पॉटच्या येथे उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट आणि व्ह्यू टॉवरवरून कॅमेराबद्धही करता येत असल्याने त्याला अनेकांकडून अधिक पसंती मिळत आहे.