बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरावर तसेच ऑफिसमध्ये १५ सप्टेंबर रोजी आयकर विभागाचे सर्वेक्षण केले असून आयकर विभागाने सोनूवर कोट्यवधी रुपयांचे टॅक्स चोरी केल्याचा आरोप लावला आहे. हे सर्वेक्षण सुमारे ४ दिवस चालू होते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, जयपुर, लखनऊ, कानपुर, आणि गुरूग्राममध्ये सोनू सुदशी संबंधित २८ जागावर सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी सोनूच्या घर आणि कार्यालयाची तपासणी करण्यात आली आणि टॅक्स चोरी केल्याचे अनेक पुरावे त्यामध्ये सापडले आहेत.
सर्वेक्षण दरम्यान अनेक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने यासंबधीत एक प्रेस रिलीज जाहीर करुन सर्व माहिती शेअर केली होती. आता अभिनेता सोनू सूदने देखील त्याच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवरून एक स्टेटमेंट जाहीर करत आपल्या मनातील असलेल्या भावना प्रकट केल्या आहेत.
सोनूने आपल्या पोस्ट केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, आपल्याला प्रत्येकवेळी आपली खरी बाजू सांगण्याची गरज पडत नाही. काय खर आहे ते, वेळच सांगेल. मी देशातील लोकांच्या सेवेसाठी स्वतःला माझ्या मनापासून आणि पूर्ण शक्तीने समर्पित झालो आहे. माझ्या संस्थेचा एक एक रुपया अनेक जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी वाट पाहत आहे. तसेच, बऱ्याच वेळा मी जाहिरातीच्या ब्रॅण्डना मला मिळणारी रक्कम काही सामाजिक संस्थाच्या कामांसाठी देण्यास सांगितली आहे. सोनू पुढे म्हणाला की, गेल्या चार दिवसांपासून मी काही पाहुण्यांच्या पाहुणाचारामध्ये व्यग्र होतो, त्यामुळे मी तुमच्या मदतीला हजर राहू शकलो नाही. आता मी संपूर्ण विनम्रतेने परतलो आहे. केवळ आयुष्यभर तुमच्या सेवेसाठी.