शहरातील गेल्या २० वर्षांपासून पडीक असलेल्या मच्छी मटण मार्केट इमारतीच्या डागडुजी व मजबुतीकरणाच्या कामाला माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी संबंधित प्रकरणात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करा, असे आदेश चिपळूण पालिकेला दिले आहेत. त्यामुळे इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिकेने शहरातील बंद अवस्थेत असलेली मच्छी-मटण मार्केट इमारत वापरात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार जुलै महिन्यात दुरवस्था झालेल्या इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. या कामावर आक्षेप घेत इनायत मुकादम यांनी २८ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामध्ये इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातील तांत्रिक बाबी गंभीर असल्याचे अधोरेखित केले असल्याचे मांडले आहे. त्या अहवालात स्पष्टपणे दुरुस्ती व मजबुतीकरणाऐवजी इमारत नवीन करून बांधणे आवश्यक असल्याची सूचना दिली आहे.
मात्र, पालिकेकडून या अहवालाकडे दुर्लक्ष करून प्लास्टर व डागडुजीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे. या इमारतीच्या दीर्घकाळ पडीक अवस्थेमुळे शासकीय निधी व सार्वजनिक हित बाधित झाले असल्याचे त्यांचे मत आहे. त्या तक्रारीची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, पालिकेला लेखी आदेश देत सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करून त्याचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता मच्छी मार्केट इमारतीचे सुरू असलेले डागडुजीचे तात्पुरते काम पालिका प्रशासन थांबविणार की सुरूच ठेवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

