फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपिठाच्या विश्वमंगल गोशाळेतील गायी-वासरांसाठी दरमहा चारा व पशुखाद्याची मदत करण्यात येत आहे. याचा प्रारंभनुकताच करण्यात आला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच गाई-गुरे, घोडे व प्राणी, पक्ष्यांसाठी मदत करत आहेत. यापूर्वी फाउंडेशनतर्फे पुण्यामधून ६०० पेक्षा जास्त गायींना चारा व निवारा, कोविडच्या काळात ४५० पेक्षा घोडे मालकांना खाद्यस्वरूपात मदत, गुजरातमध्ये मकर संक्रांतीवेळी पतंगामुळे होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व १२ हजारांवर ऑलिव्ह रिडले कासव अंडी संवर्धन केंद्राला मदत करण्यात आली आहे. प्राणी कल्याणकारी संस्था पीपल फॉर अॅनिमल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने सोमेश्वर शांतिपीठ गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी एक करार केला आहे.
याअंतर्गत गोशाळेत असलेल्या ७० गायी वासरांसाठी दरमहा चाऱ्याची व पशुखाद्याची सोय केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गोशाळेवरील दैनंदिन चाऱ्याचा ताण कमी होईल तसेच गायींचे नियमित पोषण होईल. त्या निरोगी राहतील चांगल्या पोसलेल्या गायी स्थानिक परिसंस्था व समाजाला सकारात्मक योगदान देतात. विश्वमंगल गोशाळेत चाऱ्याचे व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सोमेश्वर शांतिपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे, संचालक अनुजा पेटकर, विनोद पेटकर, स्नेहल वैशंपायन, राकेश वाघ, दाते, तेंडुलकर व फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रामबाबू सांका, सत्यव्रत नायक, नरेश खेर, अभिषेक साळवी आदी उपस्थित होते.
सोमेश्वर शांतिपीठ रत्नागिरी येथे विश्वमंगल गोशाळा या गोशाळेत सध्या ७० गायींचे संगोपनाचे काम सुरू आहे. शहरातील भटक्या व बेवारस गायींच्या संगोपनाचे येथे काम केले जाते. स्थापना दोन वर्षांपूर्वी अक्षयतृतीयेला करण्यात आली. टप्प्याटप्प्याने रत्नागिरी शहर परिसरातील गाईंचे संगोपन करण्याचे काम सुरू केले. सध्या गोशाळेच्या हे काम सुरू आहे. गोशाळेला समर्थरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनने चाऱ्याची व्यवस्था केल्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत, असे अध्यक्ष राजेश आयरे यांनी सांगितले.

