शहराला अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणारे शीळ धरण जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. हे धरण रत्नागिरी पालिकेकडे वर्ग करावे यासाठी महत्त्वाची बैठक आज मुंबई मंत्रालयात झाली. जलसंपदा विभागाने या धरणाच्या कामासाठी १९ कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम थकीत असून, ती पालिकेने जलसंपदा विभागाला द्यावी, अशी मागणी या विभागाने केली आहे; मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन बीड दौऱ्यावर गेल्यामुळे बैठक रद्द झाली; परंतु पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन निर्णय होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जलसंपदा व पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे या बैठकीला उपस्थित राहणार होते. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे व्हावे यासाठी मंत्री सामंत यांचे प्रयत्न आहेत.
शीळ धरण मालकीचे झाल्यास पालिकेचे धरणावर पूर्ण नियंत्रण राहील आणि भविष्यात शहराला पाणीपुरवठा करणे अधिक सुलभ होईल, असे म्हटले जात आहे. या पाण्यावर पालिकेचे १०० टक्के आरक्षण आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये धरणाच्या सांडव्याच्याबाजूचा काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काही अंशी धोका निर्माण झाला. दरवर्षीथोडाथोडा भागखचत असल्यानेतो डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत बाधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी १४ कोटी मंजूर करून धरण अधिक मजबूत केले आहे. आतापर्यंत जलसंपदा विभागाने या धरणावर सुमारे १९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
पालिका महिन्याला भरते साडेपाच लाख – शहरापासून हे धरण साडेसहा किमी लांब आहे. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने भाडेतत्त्वावर ते घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखांचा पाण्याचा कर पालिका जलसंपदा विभागाला भरते. विशेष म्हणजे या पाण्यावर १०० टक्के अधिकार पालिकेचा आहे. ते अन्य दुसऱ्या कोणत्याही वापरासाठी आरक्षित नाही. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटरएवढी आहे. लाखाच्यादरम्यान लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी शहराला दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणीपुरवठा या धरणातून केला जातो. पानवल, नाचण्यातील तलाव सोडले तर पाणीपुरवठ्याचा सर्वांत जास्त भार शीळ धरणावर आहे.

