26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeSindhudurgलाटांच्या तडाख्याने देवगडजवळ नौका बुडाली...

लाटांच्या तडाख्याने देवगडजवळ नौका बुडाली…

नौकेचे मालक राजेंद्र भिल्लारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

समुद्रातील खराब हवामानामुळे येथील बंदरात परतणारी ‘त्रिवेणी’ ही मच्छीमारी नौका वादळी वाऱ्यामुळे लाटांच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून नौकेवरील सर्व सहा मच्छीमारांना अन्य एका नौकेवरील मच्छीमारांनी सुखरूप आपल्या नौकेवर घेतल्याने ते बचावले. ही घटना गुरुवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात घडली. यामध्ये नौकामालक राजेंद्र बाळकृष्ण भिल्लारे (रा. देवगड) यांचे सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले. याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेली माहिती अशी येथील देवगड बंदरातील ‘त्रिवेणी’ ही मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रातील वातावरण खराब बनत चालले होते. किनारी भागात वाऱ्यासह पाऊस पडत होता.

असे वाचविले खलाशांचे प्राण – वातावरणातील बदलामुळे ‘त्रिवेणी’ नौका देवगड बंदराकडे परत येत होती. रात्री साडेसातच्या सुमारास तालुक्यातील कळाशी भागातील समुद्र परिसरात अचानक उद्भवलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे, लाटांच्या तडाख्याने नौका दुर्घटनाग्रस्त होण्याच्या स्थितीत होती. नौका आपत्तीग्रस्त होण्याच्या स्थितीत असल्याची जाणीव नौकेवरील तांडेल बसप्पा कुरे (वय ४३) यांना झाली. त्यामुळे नौकेवरील मच्छीमारांचा बचाव करण्यासाठी त्यांनी तत्काळ वायरलेस यंत्रणेद्वारे जवळपास असलेल्या ‘देवयानी’ या मच्छीमारी नौकेला मदतीसाठी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून ‘देवयानी’ या मच्छीमारी नौकेवरील तांडेल आणि त्यांच्या सहकारी मच्छीमारांनी ‘त्रिवेणी’ नौकेवरील तांडेल कुरे यांच्यासह एकूण सहा मच्छीमारांना रात्री आठच्या सुमारास दोरीच्या सहायाने सुखरूप आपल्या नौकेवर घेतले.

त्रिवेणी’ला बंदरावर आणण्याचे प्रयत्न असफल – दरम्यान, दुघर्टनाग्रस्त नौकेसह त्यावरील साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी ‘त्रिवेणी’ नौकेला ओढून बंदराकडे आणण्याचाही प्रयत्न केला गेला; परंतु नौकेत पाणी भरल्याने आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे ती वाचविणे शक्य झाले नाही. यामुळे नौकेचे मालक राजेंद्र भिल्लारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दुर्घटनाग्रस्त मच्छीमारी नौकेवर काही डिझेलने भरलेली पिंपे (बॅरेल), मच्छीमारी जाळी, बिनतारी संदेश यंत्रणा (वायरलेस), जेवण बनविण्याचे साहित्य तसेच नौकेवरील अन्य साहित्याचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांसमवेत घटनास्थळी भेट दिली.

हवामानाचा फटका – हंगामाच्या सुरुवातीलाच अशी दुर्घटना घडल्याने मच्छीमार कोलमडून गेले आहेत. समुद्र आणि किनारी भागातील वातावरण अजूनही निवळलेले नाही. समुद्रात अचानक वेगाने बदल होत असल्याने त्याचा फटका मच्छीमारांना बसतो. अशा वेळी सावधगिरी बाळगून मच्छीमारी करणे आवश्यक बनल्याची बाब यामुळे अधोरेखित होत आहे.

नौकेत पाणी भरल्यामुळे – मत्स्यव्यवसाय विभागाने आज सकाळच्या सुमारास पंचनामा केला. अचानक उद्भवलेले वादळी वारे आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बहुदा नौकेच्या खालील बाजूच्या दोन फळ्या निघून गेल्या असाव्यात आणि त्यामुळे नौकेत पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्घटनाग्रस्त ‘त्रिवेणी’ नौका पूर्णपणे बुडाल्याने नौकामालकांचे सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान, हवामान विभागाने वादळी वाऱ्याच्या प्राथमिक सूचना मच्छीमारांना दिली होती, अशी माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular