गुन्हा दाखल झाला तर काहीच मिळणार नाही… मला वेळ द्या मी सर्वांचे पैसे देतो… आपली गुंतवणूक मोठी आहे…’ अशा शब्दांत बनवाबनवी आणि गोड शब्दांत धमकी देणाऱ्या टीडब्लूजे असोसिएशन’ कंपनीवर अखेर चिपळूणमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हजारो कोटी रूपयांची लुबाडणूक केल्याचा ठपका ठेवत या कंपनीवर गुन्हा दाखल होताच ठेवीदारांमध्ये घबराट पसरली आहे. तर फसले गेल्याने अनेकांना अश्रू आवरणे अवघड झाले.संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या टीडब्लूजे या कंपनीवर चिपळूण पोलीस स्थानकात कामथे येथील प्रतीक दिलीप माटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. त्यांनी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवी सन २०२३ मध्ये ठेवल्या होत्या, मात्र त्यांना वेळेवर परतावा मिळाला नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
२०१८ पासून सुरवात – सन २०१८ पासून चिपळूण, गुहागर, दापोली या ठिकाणी शाखा काढून आलिशान कार्यालय उभारत ठेवीदारांना जादा परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या माध्यमातून ठेवी गोळा करण्यात आल्या. बघता बघता मोठमोठे लोकं या कंपनीशी जोडले गेले आणि सुरूवातीला परतावा वेळेत मिळू लागला. त्यामुळे कंपनीचा गवगवा होऊ लागला, ठेवीदारांची संख्याही झपाट्याने वाढली.
बोंबाबोंब सुरू – गुंतवणुकीवर ३ ते ४ टक्के नफा मिळत असल्याने गुंतवणूकदारही खुश होते. त्यानंतर नफा वेळेत मिळत नव्हता आणि काही दिवसांनी नफा सोडा, मुद्दलही न मिळाल्याने बोंबाबोंब सुरू झाली. ठेवीदार सतत कार्यालयात धाव घेऊ लागले. मात्र त्यांना थंड डोक्याने गोड उत्तर देत शांत करण्यात येत होते. ठेवीदारांना पैसे मिळतील, असेच वाटत होते. एवढा विश्वास कंपनीवर होता. मात्र परतावा न मिळू लागताच चलबिचल सुरू झाली.
गोड धमकी – ठेवीदारांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. ‘पोलीस स्थानकात तक्रार झाली तर पैसे मिळणार नाहीत, मग हा सर्व विषय कोर्टात असेल, आम्ही काही करू शकत नाही. त्यासाठी थोडे दिवस थांबा, नाहीतर काहीच मिळणार नाही’ अशा गोड शब्दांत धमकी देऊन ठेवीदारांना तक्रारीपासून लांब केले जात होते, असे आरोपही आता अनेक ठेवीदारांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे ठेवीदार कसेतरी एकदा मुद्दल तरी मिळू देत, म्हणून गप्प होते.
परदेशात गुंतवणूक – कंपनीच्यावतीने थातुरमातुर कारणे सांगितली जात होती. परदेशात गुंतवणूक केली आहे, मेरीटाईम बोर्डात काम सुरू आहे, अशा एक ना अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात होते. आपल्या कंपनीला मोठा फायदा होणार असल्याचे गोड आमिष वेळोवेळी दिले जात होते.
चौघांवर गुन्हा दाखल – प्रतीक माटे यांनी साडेतीन लाख रूपयांची आणि त्यांची बहीण तृप्ती माटे यांनी २५ लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. या प्रकरणी कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेत घाग, सूरज कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.
अनेकांना अश्रू अनावर – अनेक ग्राहकांनी पै पै साठवलेला पैसा या कंपनीत गुंतवला होता. मात्र कंपनीचे तीनतेरा वाजल्यानंतर अनेक सर्वसामान्य ग्राहकांना अश्रू अनावर झाले होते. राखून ठेवलेली पुंजी गेल्याचे अनावर दुःख सहन करावे लागत आहे. सर्वसामान्य ग्राहक पुरता ढासळून गेल्याचे पहावयास मिळाले आहे.