गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून तिलारी येथे सुमारे ५० जणांच्या जमावाने मोटार पेटविल्याच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले. पोलिसांसमक्ष संबंधित चालकाला जमावाने मारहाण केली. यानंतर दोडामार्ग पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले. स्वतः पालकमंत्री नीतेश राणे येथे दाखल झाले. पोलिसांनी येथील नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस व अन्य मिळून पाच जणांना अटक केली. या प्रकरणाने निर्माण झालेला तणाव आजही कायम होता. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांतर्फे परशुराम गंगाराम सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुमारे पन्नास ते साठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गैर कायदेशीर जमाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, लोकसेवकाला कायदेशीर काम करण्यापासून परावृत्त केल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. त्यावरून संशयित नगराध्यक्ष चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष गवस, महिंद्र खरवत, विजय कांबळे, वैभव रेडकर या पाच जणांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.
पालकमंत्री राणे यांनी काल रात्री यासंबंधी माहिती घेण्यासाठी दोडामार्ग पोलिस ठाण्याला भेट दिली. यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून घाबरायचे कारण नाही, नगराध्यक्षांसह इतरांना लवकरच बाहेर काढू, असे कार्यकर्त्यांना सांगितले. याबाबत पोलिस परशुराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीतील आशय असा, गुरुवारी (ता. २५) निजामुद्दीन मोहम्मद कुरेशी हा मोटर (जीए ०६ एफ ४५०७) घेऊन जात असताना त्यात बकरासदृश प्राण्याचे मांस असल्याचे वीजगर येथील तपासणी नाक्यावर वाहन तपासत असताना लक्षात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधित चालकाची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता दोडामार्ग पोलिस ठाणे येथे घेऊन जात होतो. दरम्यान, आम्ही दुपारी साडेबाराच्या सुमारास दोडामार्ग-बेळगाव रोडवर पातळेश्वर मंदिराजवळ आलो असता सुमारे ५० ते ६० लोकांनी चारचाकी व दुचाकी वाहनाने रस्ता अडविला. मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर संबंधितांनी चालकाला मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी याला बाहेर ओढून लाथाबुक्याने, तसेच लाकडी दांड्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.
या तक्रारीनंतर काल उशिरा श्री. चव्हाण यांच्यासह पाच जणांना अटक केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला. तहसील कार्यालयाच्या आवारात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व चव्हाण यांच्या मित्र परिवाराचा मोठा जमाव होता. शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर होते. घटनेचे गंभीर लक्षात घेता अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवून कोणालाही आत न पाठवण्याचे आदेश दिले. दरम्यान, रात्री साडेदहा वाजता पालकमंत्री राणे यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिस अध्यक्ष व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करून घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र, यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. यावेळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसहित भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, एकनाथ नाडकर्णी, संतोष नानचे, महेश सारंग, तसेच तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.