मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी रात्रीपासून जिल्हयात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कोसळायला. सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभर अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जनजीवनावर परिणाम झालेला नाही. मात्र नवरात्र उत्सवाच्या उत्साहावर पावसामुळे विरजण पडले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवार, रविवार असे दोन दिवस रत्नागिरी जिल्हयासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले असून सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात रात्री सरींवर सरी बरसत होत्या. दापोली, खेड, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी सर्व तालुक्यात शनिवारी सकाळी देखील पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारपासूनच आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी आच्छादल्याने दाट काळोख पसरला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र दिवसभर रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम सरी कोसळत होत्या. आजच्या पावसामुळे उशिरा येणाऱ्या भातपीकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्ण वाढ झालेल्या रोपांतून लोंब्या बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे. भातशेतांमध्ये पाणी साचले आहे. शिवाय भातपीकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्व किनारपट्टीवर म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नवरात्रात पाऊस होईल असा अंदाज होता तो खरा ठरला. पावसाचा जनजीवनावर फारसा परीणाम झाल्याचे दिसत नव्हते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. मात्र नवरात्र उत्सवाच्या उत्साहावर पावसामुळे पाणी पडले आहे. उत्सवाच्या मंडपात पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे रात्रीचा रासगरबा, दांडिया यासह इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. काही ठिकाणी दांडिया स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पावसात कशा घ्यायच्या असा प्रश्न पडला आहे. पावसामुळे अनेकांना देवीदर्शनाचे बेत रद्द करावे लागले.