रत्नागिरीतील गाजलेल्या तिहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याच्या कारनाम्याला साथ देणारे त्याचे वडील दर्शन पाटील यांचा मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरजोळे येथील भक्ती मयेकर खून उघड झाल्यानंतर मुख्य संशयित दर्शन पाटील यांचा मुलगा दुर्वास पाटील याने वर्षापूर्वी राकेश जंगम व सीताराम वीर यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासात तिहेरी खून प्रकरणातील दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांनी मुलाच्या कारनाम्यावर पडदा टाकणे जसे पुरावा नष्ट करणे, गुन्हा करण्यास प्रेरित करणे याप्रकरणी त्याच्यावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुह्यातील माहितीनुसार २९ एप्रिल २०२४ ला खंडाळा येथील सायली बारमध्ये दुर्वास पाटील व त्याच्या साथीदारांनी कळझोंडी येथील सीताराम वीर याला मारहाण केली होती. या मारहाणीत वीर याचा मृत्यू झाला होता. ही बाब सायली बारमधील राकेश जंगम याला माहिती होती.
राकेश हा खून झाल्याचे उघड करेल अशी भीती दुर्वास याला होती. यातून दुर्वास याचे वडील दर्शन पाटील यांनी राकेश जंगम याच्या आईची भेट घेतली. तसेच काही पैसे देऊन गाव सोडून अन्य ठिकाणी राकेश याला पाठवा, असे सांगितले होते. तपासात पोलिसांनी दर्शन पाटील यांना अटक केली होती. ते आजारी असल्यामुळे त्यांच्यावर प्रथम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यांना रक्तदाब, कॉलोस्ट्रोलचा आजार होता. पोलिसांचा तपास सुरू असतानाच दर्शन पाटील यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या सुनावणीत दर्शन पाटील यांची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची तब्येत खालावल्यामुळे अधिक उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी (ता. २९) त्यांचा मृत्यू झाला.