चिपळूण तालुक्यातील गुढे, कळंबट परिसरात वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याची घटना सलग दुसऱ्यांदा घडल्यानंतर वन विभाग खडबडून जागा झाला आहे. गुढेतील रवींद्र पांडुरंग आग्रे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने या परिसरात गस्त याशिवाय वाढवली आहे. परिसरातील ग्रामस्थांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील आठवड्यात कळंबट येथे कार्तिक तुषार शिरकर या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात तो जखमी झाला असून अद्याप त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर या परिसरात वन्य प्राण्यांविषयी भीती निर्माण झाली आहे. अशातच शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास ते तालुक्यातील तनाळी येथे डॉक्टरांकडे दुचाकीवरून निघाले होते. मोरेवाडी येथे वाटेतच गवा रेड्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी होऊन तेथेच बेशुद्ध अवस्थेत पडले होते.
गुढे मोरेवाडी स्मशानभूमीजवळ ही दुर्दैवी घटना घडली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सलग दोन वेळा वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वन विभागाकडून या परिसरात गस्त वाढवली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पंचनामा केला. त्यामध्ये काही ठिकाणी गवा रेड्याचे केस आणि पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यानुसार त्या मृत कुटुंबाच्या मदतीसाठी वन विभागाकडून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयात रवींद्र आग्रे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घरातील कर्ता पुरुष हरपला – रवींद्र आग्रे यांच्या रूपाने घरातील कर्ता पुरुष हरपल्यानंतर त्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले आहे. अतिशय मेहनती असलेले आग्रे यांनी मोठ्या कष्टाने काजू फॅक्टरीचा व्यवसाय उभारला होता. त्याच्या जोडीला वडाप व शेती असे पूरक व्यवसाय ते करत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.