आंबिया बहार योजनेत सहभागाकरिता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विमा पोर्टल सुरू झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून आंबा व काजू फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे व ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये फळपिकाची नोंद करणे या बाबी बंधनकारक आहेत. विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक तसेच www.pmfby.gov. in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा.
विमाअर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभाग, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. या योजनेचा विमा संरक्षित कालावधी हा १ डिसेंबर २०२५ ते १५ मे २०२६ आहे. आंबापिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर आणि काजूपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख २० हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता ६ हजार रुपये प्रतिहेक्टर आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे, असे सदाफुले यांनी सांगितले.