एका ६५ वर्षांच्या वृध्दाने आपल्या घरात शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधान दाखवत घराबाहेर काढले आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचविले. अशोक गंगाराम रवंदे असे या बहाद्दर वृध्दाचे नाव असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील किरबेट गावी बुधवारी भल्या पहाटे हा प्रकार घडला. अधिक वृत्त असे की, किरबेटमधील ओझरवाडीत राहणारे अशोक रवंदे (वय ६५) हे बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास उठले व घराबाहेर गेले व त्याचवेळी बिबट्यां घरात शिरला. त्यांच्या ते लक्षात आले नाही. मात्र अशोक रवंदे हे जेव्हां पुन्हा घरात आले व त्यांनी दरवाजा बंद केला, तेव्हा त्यांना अचानक कुत्र्याचा आवाज ऐकू आला. काय आहे ते पाहण्यासाठी त्यांनी लाईट लावला आणि ते हबकले.
बिबट्याची झडप – कारण नेमकी त्याचवेळी त्यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घातल्याचे त्यांना दिसले. ते हबकले, मात्र त्याही परिस्थितीत ते घाबरले नाहीत. त्यांनी काही क्षणात स्वतःला सावरले. घरातील सर्व दरवाजे बंद असल्याने बिबट्याला घरातून बाहेर पडता येत नव्हते. आता काय करायचे? त्याला घराबाहेर तर काढलेच पाहिजे, मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले होते.
दरवाजा उघडला – घरामध्ये झोपलेले वयोवृद्ध गंगाराम सिताराम रवंदे (वय ९५), सुंदराबाई रामचंद्र रवंदे (वय ६०), शेवंती अशोक रवंदे (वय ५५) ही सर्व मंडळी होती. त्यांनाही बिबट्याची चाहूल लागली. ती उठली आणि सर्वांची घालमेल सुरु झाली. आरडाओरड झाली, काय करायचे सुचेना, हा सारा प्रकार अर्धा तास सुरु होता. मात्र अशोक रवंदे (वय ६५) यांनी धाडस करून बिबट्याची नजर चुकवत घराचा दरवाजा उघडला आणि काय आश्चर्य, बिबट्या पळून गेला. जर दरवाजा उघडला नसता तर बिबट्याने अवघ्या कुटुंबावर हल्ला केला असता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला असून त्याचेही प्राण वाचवण्यात अशोक रवंदे यांना यश आले आहे.
अभिनंदनाचा वर्षाव – अशोक रवंदे यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांचे प्राण वाचविले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान याबाबतची कल्पना पोलीस पाटील प्रदीप अडबल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रवंदे यांच्या कुटुंबाची विचारपूस केली व अशोक रवंदे यांच्या धाडसाचे कौतुक केले.