मासळी बाजारांमध्ये माशांचे दर वधारलेले आहेत; मात्र नवरात्रोत्सव व दसरा सणानंतरही दर चढे असले तरीही मासळी बाजारात काल (ता. ८) ग्राहकांची गर्दी होती. ताजी मासळी नसल्याने बाजारात बर्फात साठवून गोठवलेली मासळीची विक्री सुरू होती. वादळीवारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक नौका मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नाहीत. काही नौका धोका पत्करून समुद्रात गेल्या आहेत; परंतु त्यांना अपेक्षित मासळी मिळत नाही. त्यामुळे मासेमारी व्यवसाय थंडावलेला आहे. परिणामी, बर्फात गोठवलेली मासळीची विक्री सध्या सुरू आहे. जी काही थोडीफार ताजी मासळी मिळते. तिचे दर फारच चढे आहेत. आठवड्यापूर्वी जी छोटी सुरमई १५० ते २०० रुपये किलो दराने मिळत होती ती ५०० रुपयांनी विकली जात आहे. मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर ५०० रुपये होता, तो आता ८०० रुपये झाला आहे.
५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळणारा पापलेटचा दर किलोला १ हजार रुपये आहे. लहान सरंग्याचा दर २५० रुपयांवरून ४०० रुपयांवर तर मोठ्या सरंग्याचा दर ६०० रुपये किलोइतका झाला. बांगडे मात्र १५० रुपये किलो दराने, तर सौंदाळे २५० रुपये किलो दराने मिळत आहेत. जी कोळंबी २५० रुपये किलो दराने मिळायची त्या कोळंबीचा दर ५०० ते ६०० रुपयापर्यंत पोहोचला होता; परंतु, उपवास सुटल्यामुळे माशांच्या दराचा ग्राहकांवर काही परिणाम झाला नाही. चिपळूण शहरातील गुहागरनाका, मच्छीमार्केट, बहादूरशेख नाका, खेर्डी, अलोरे, पोफळी सावर्डे येथील मासळी बाजारांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.